आळंदी - आळंदी नगर परिषदेच्या दोन स्वीकृत सदस्य निवडीसाठी झालेल्या विशेष सभेत भाजपाच्या वतीने संतोष गावडे यांची, तर शिवसेनेच्या वतीने राणी रासकर यांची निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी वैजयंता उमरगेकर यांनी केली.नगर परिषद सभागृहात शनिवारी (दि.५) दुपारी दोन वाजता विशेष सभा झाली. याप्रसंगी मुख्याधिकारी समीर भूमकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, भाजपाचे गटनेते पांडुरंग वहिले, शिवसेनेचे गटनेते तुषार घुंडरे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.दोन स्वीकृत सदस्यांच्या जागेसाठी १७ अर्ज पुणे कार्यालयात जमा झाल्याचे जाहीर कारण्यात आले.वैध नावात केवळ ५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. यात संतोष गावडे, सुरेश तापकीर, सचिन काळे,राणी रासकर, संदीप रासकर यांच्या नावाचा समावेश होता.भाजपाचे गटनेते पांडुरंग वहिले यांनी भाजपाच्या वतीने आळंदीचे भाजपाचे प्रभारी संतोष गावडे यांचे एकमेव नावाची शिफारस करीत प्रस्ताव दिला. शिवसेनेच्या वतीने गटनेते तुषार घुंडरे यांनी राणी रासकर यांच्या नावाचा प्रस्ताव दिला. आळंदी नगर परिषदेतील शिवसेना आणि भाजपाच्या पक्षीय बलाबलाचा विचार करता प्रत्येकी एक एक सदस्य निवडला जाणार होता. यात निर्धारित भाजपा व शिवसेनेच्या गटनेत्यांनी एक एक नावाचा प्रस्ताव सभेत सादर केल्याने दोन्ही प्रस्ताव मान्य करण्यात आले. पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा उमरगेकर यांनी भाजपाच्या वतीने दाखल प्रस्तावाप्रमाणे संतोष गावडे यांची तसेच शिवसेनेच्या वतीने दाखल प्रस्ताव मान्य करीत राणी रासकर यांची आळंदी नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.आळंदी नगर परिषदेत स्वीकृत सदस्य दिनेश घुले व सविता गावडे यांनी राजीनामे दिल्याने नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. आळंदी नगर परिषद सभागृहात भाजपाचे ११, शिवसेनेचे ६ तसेच सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत २ अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. यामुळे पक्षीय बलाबलाचा विचार करता शिवसेना व भाजपा यांचे गटातून शिफारस पात्र प्रत्येकी एक एक सदस्य यांची वर्णी लागली. राणी रासकर या राजगुरुनगर नगर परिषदेचे भाजपाचे माजी नगरसेवक संदीप रासकर यांच्या पत्नी आहेत. आळंदीत शिवसेनेच्या वतीने त्यांना स्वीकृत सदस्य पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वीदेखील शिवसेनेने महिला उमेदवार देऊन महिलांना संधी देण्याचा प्रयत्न केला.न्यायालयात दाद मागणारस्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेतील अर्ज छाननीत अवैध अर्ज मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेकांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. छाननीत अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवारांनी छाननीत अर्ज बाद केल्याचा आरोप केला. याबाबत अधिक माहिती घेऊन न्यायालयात दाद मागणार असल्याचे दत्तात्रय काळे यांनी सांगितले.मागील वेळी वैध ठरलेले अर्ज आता बाद कसे ठरतात, असासवाल त्यांनी व्यक्त केला. अनेक नाराज उमेदवारांनी छाननी कागदपत्र तसेच निकालपत्र राखून ठेवण्याची मागणी केली.
स्वीकृत सदस्यपदी संतोष गावडे, राणी रासकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 2:46 AM