पुणे : मुसेवाला हत्याकांडातील संशयित म्हणून संतोष जाधव याचा देशभर गवगवा झाला आहे. त्यातून मंचर, नारायणगाव, जुन्नर परिसरात १०० हून अधिक तरुणांमध्ये त्याच्याविषयी आकर्षण निर्माण झाले आहे. पौगंडावस्थेत असलेल्या या युवकांना चांगले वाईट समजत नसल्याने अशा युवकांची यादी पोलिसांनी तयार केली असून त्यांच्याबरोबरच त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
संतोष जाधव व त्याच्या बिष्णोई टोळीचा सोशल मीडियावर मोठा फॉलोअर्स आहे. त्याच्या प्रमाणे वेशभूषा करणे व त्याचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटला टाकणे. त्याचा डीपी ठेवणे असे प्रकार या भागात सुरु आहे. या प्रकरणाचा शोध घेत असताना सोशल मीडियावर असे किमान १०० हून अधिक अकाऊंट पोलिसांना सापडली. या गुंडांचे उदात्तीकरण केले जात आहे. त्यातून नकळत हे युवक गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याचा मोठा धोका आहे. या युवकांना त्यातील धोके सांगून त्यांच्या पालकांना सावध करण्याचे काम पोलीस करणार आहेत.
राज्यातील टोळीची पाळेमुळे खणणार
बिष्णोई टोळी छोट्या मोठ्या गुन्ह्यात अडकलेल्या तरुणांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करते. पोलीस ज्यांच्या शोधात आहेत, त्यांची माहिती मिळवून त्यांना मदत करण्याचा, पोलिसापासून वाचविण्यासाठी आश्रय देण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर त्यांना आपल्या टोळीत सामील करुन घेऊन त्यांच्याकडून मोठे गुन्हे करवून घेते. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांच्याविषयी सहानभुती असणारे तरुण आहेत. त्यांची पाळेमुळे खणून काढण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत.