लोणी काळभोर : संतोष जगताप हत्याकांडात वापरलेले गावठी पिस्तुल पुरवल्याप्रकरणी आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे या खुनप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या ५ झाली आहे.
याप्रकरणी अभिजीत सोपान यादव ( वय २२, रा. मेडद, ता. बारामती, जि. पुणे ) व आकाश जगन्नाथ वाघमोडे ( वय २८, रा. कुर्डवाडी ता. म्हाडा जि. सोलापुर ) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षापुर्वी दोन भावांना जिवे ठार मारल्याचा राग, जगताप करत असलेला वाळुचा व्यवसाय या गोष्टींवरून गुन्ह्याचा मास्टरमाईंड उमेश सोपान सोनवणे सह चौघांनी एकत्रित येऊन २२ ऑक्टोबरला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उरूळी कांचन येथील हॉटेल सोनाई समोर जगतापवर तिघांनी केलेल्या गोळीबारात जगताप हे जागीच मृत्यू झाला होता. यामध्ये त्याचे अंगरक्षक शैलेंद्रसिंग व मोनुसिंग हे गंभीर जखमी झाले होते. तसेच जगताप याच्या अंगरक्षकाकडून केलेल्या गोळीबारात मारेक-यामधील एकजण जागीच ठार झाला होता.
दाखल गुन्हयात यापूर्वी संतोष जगताप याचे मारेकरी पवन गोरख मिसाळ ( वय २९ ) व महादेव बाळासाहेब आदलिंगे ( वय २६, दोघे रा.उरूळी कांचन ता. हवेली ) तसेच सुत्रधार उमेश सोपान सोनवणे ( वय ३४ वर्षे, रा. राहु ता. दौंड ) यांना अटक करण्यात आली आहे. तपासात त्यांच्याकडे गुन्हयात वापरलेले गावठी पिस्तुल त्यांना अभिजीत यादव व आकाश वाघमोडे यांनी पुरवल्याचे निष्पन्न झाले.
त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी पिस्तुल पुरवणा-या इसमांचा शोध घेणेबाबत तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांना आदेश दिले होते. आदेशाप्रमाणे पोलीस हवालदार नितीन गायकवाड, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, शैलेश कुदळे, राजेश दराडे, यांच्या पथकाने गोपनीय खबऱ्यामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणाव्दारे दोघांचा शोध घेऊन वाघमोडे आणि यादव यांना बारामतीमधून शिताफीने ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यावर न्यायदंडाधिकारी यांनी त्यांना ८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.