पुणे : वाळू व्यावसायिक गुंड संतोष जगताप याच्यावर गोळ्या झाडून खून करणाऱ्या महादेव आदलिंगे टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या टोळीविरूद्ध पुणे शहर, ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, सोलापूर धाराशिवमध्ये १५ गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात सराईत टोळ्यांविरूद्ध करण्यात आलेली ही ६० वी मोक्का कारवाई आहे.
टोळीप्रमुख महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय २८, रा. उरळी कांचन), स्वागत बापु खैरे (वय २५, मयत-टोळी सदस्य) पवन उर्फ प्रशांत गोरख मिसाळ (वय २९,रा.दत्तवाडी, उरूळी कांचन), उमेश सोपान सोनवणे (वय ३५. रा. राहु, ता. दौंड ) अभिजीत अर्जुन यादव (वय २२,रा. मेडद, बारामती), आकाश उर्फ बाळु जगन्नाथ वाघमोडे (वय २८, रा. पटेल चौक, कुर्दुवाडी, माढा), महेश भाऊसाहेब सोनवणे ( वय २८, रा. भांडवाडी वस्ती, राहु) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आदलिंगे टोळीतील साथीदार उमेश सोनवणे याने भावाचा २०११ मध्ये झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी व अवैध वाळू व्यवसायात वर्चस्व निर्माण करण्यासाठी वाळू व्यावसायिक गुंड संतोष जगताप याच्यावर गोळीबार करून ठार केले होते. याप्रकरणी टोळीविरूद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदलिंगे याची गुन्हेगारी टोळी लोणी काळभोर परिसरात सक्रिय
आदलिंगे याची गुन्हेगारी टोळी लोणी काळभोर परिसरात सक्रिय होती. त्यांनी आजुबाजूच्या भागात शरीराविरूध्द आणि मालमत्तेविरूध्द अनेक गुन्हे केले आहेत. त्यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, खुनाची सुपारी देणे, अग्निशस्त्राची विक्री, विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणे, दुखापत करणे अशा स्वरुपाची गुन्हेगारी सुरूच ठेवली होती. त्याच्याविरूद्ध पुणे शहर, पुणे रेल्वे, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, सोलापूर व उस्मानाबादमध्ये एकुण १५ गुन्हे दाखल आहेत. टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्फत अपर आयुक्त नामदेव चव्हाण यांना पाठविला होता. त्यास मंजूरी देण्यात आली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक अमित गोरे, गणेश सातपुते, संदिप धनवटे, गणेश भापकर, मल्हारी ढमढेरे यांनी केली. सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते हे अधिक तपास करीत आहेत.