लोणावळा : लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या घराच्या बाहेर तिरडीचा उतारा व मृत्युयंत्र ठेवल्याच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेला संतोष पिंजण याने गुरुवारी मध्यरात्री कोेठडीत टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टळली.याप्रकरणी शुक्रवारी दि. २१ रोजी वडगाव पोलीस ठाण्यात पिंजण याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कोठडीतील चौकशीत भांगरवाडी येथील मंगेश शेलार या व्यक्तीने मला वरील कृत्य करायला लावले असल्याचे पिंजण याने सांगितले. लोणावळ शहर पोलिसांनी शेलार यालाही अटक केली. त्यास शनिवारी वडगाव न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर, पिंजण याला शनिवारी जामीन मंजूर झाला.दरम्यान, पिंजण व शेलार यांच्यात मागील काही वर्षापासून वाद असून, ते एकमेकाशी बोलत देखील नाहीत. यामुळे जाणीवपूर्वक पिंजण याने शेलार याचे नाव या प्रकरणात गोवले असून खऱ्या मुख्य आरोपीला बगल देण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचे आरोप या प्रकरणातील फिर्यादी नगराध्यक्षा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी करत पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.मुख्य आरोपीसह सफेद रंगाची गाडी व रिव्हॉल्व्हर पोलिसांनी तत्काळ जप्त करावी. अन्यथा येत्या दोन दिवसांत लोणावळा बंद करत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)
संतोष पिंजणचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: April 23, 2017 4:20 AM