पुणे - केशवनगर येथे एका सराफी दुकानावर ५ जणांच्या टोळक्याने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला़ सराफ व्यावसायिकाने चोरट्यांना विरोध करताना आरडाओरडा केल्याने त्यांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करुन पळ काढला़ केशवनगर येथील हरिकृष्ण ज्वेलर्स या दुकानात भरदुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली़मिलन महेंद्रसिंह सोनी (वय ३२, रा़ सोमवार पेठ) हे सराफ व्यावसायिक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे़याबाबत पोलिसांनी सांगितले की, मिलन सोनी यांचे केशवनगर येथे रस्त्याच्या कडेला हरिकृष्ण ज्वेलर्स नावाचे दुकान आहे़ दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक महिला ग्राहक त्यांच्या दुकानात आली होती़ त्यांच्याशी सोनी बोलत असतानाच तोंडाला अर्धवट रुमाल बांधलेले तिघे जण मोटार सायकलवरुन हातात कोयते घेऊन आले़ त्यांच्या पाठोपाठ आणखी दोघे जण दुकानात घुसले़ प्रथम आलेल्यांपैकी दोघांनी त्यांच्या हातातील कोयत्याने सोनी यांच्या हातावर, खांद्यावर मारहाण केली़ त्यात ते जखमी झाले़ या गोंधळामुळे महिला आरडाओरड करत बाहेर गेल्या़ नंतर आलेल्यांपैकी एकाने काचेच्या काऊंटरवर उडी मारुन शोकेस मधील दागिने घेण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा सोनी यांनी आरडाओरडा केल्याने व नागरिक जमा होऊ लागल्याचे दिसताच सर्व जण दुकानाबाहेर पळून गेले़ सोनीही त्यांच्या पाठोपाठ गेले़ त्यांनी जवळ पडलेल्या विटा त्यांच्या दिशेने भिरकाविल्या़ तेव्हा त्यांच्यातील एक जण याला गोळ्या घाला, असे म्हणत ते पळून गेले़या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख, भानुप्रताप बर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पात्रुडकर, महेंद्र जगताप यांनी घटनास्थळाला भेट दिली़सीसीटीव्ही फुटेज मिळालेपोलिसांना घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. त्यावरुन आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सोनी यांनी दहा दिवसांपूर्वीच येथे सराफीपेढी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे दोन तरुण ग्राहक म्हणून आले होते. ते केवळ थोडा वेळ रेंगाळून चौकशी करुन गेले, मात्र त्यांनी काहीच खरेदी केली नाही. यामुळे दोघांवरही संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी कदाचित अगोदर रेकी करुन नंतर गुन्ह्याचा प्लॅन केला असल्याची शक्यता आहे. सोनी यांनी केलेल्या प्रतिकाराचे पोलीस व नागरिकांकडून कौतुक होत आहे.
सराफ व्यावसायिक जबर जखमी, दरोड्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 2:36 AM