पुणे : सोन्याच्या दागिन्यांवर अबकारी करात एक टक्का वाढ केल्याच्याविरोधात राज्यातील सराफांनी पुकारलेला बेमुदत बंद सुरूच राहणार आहे. गुरुवारी देशभरातील सराफी व्यावसायिक दिल्लीत आंदोलन करणार असून तिथेच पुढील दिशा ठरविली जाणार आहे, असे महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष अॅड. फत्तेचंद रांका यांनी सांगितले.केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या दागिन्यांवरील अबकारी करात एक टक्का वाढ करण्याचे जाहीर केले. त्यानंतर राज्यासह देशभरात त्याविरुद्ध सराफांनी आंदोलन सुरू केले आहे. राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशननेही मागील पंधरा दिवसांपासून दुकाने बंद ठेवून वाढीव अबकारी कराला विरोध केला. हे आंदोलन पुढे सुरू राहण्याची शक्यता आहे. अॅड. रांका म्हणाले, ‘‘दिल्लीमध्ये गुरुवारी आंदोलन केले जाणार आहे. त्यामध्ये राज्यातून २० ते २५ हजार सराफ सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारकडून लहान सराफांवर कर लागणार नाही, असे सांगितले जात असले तरी आता सराफांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. लहान सराफही आंदोलनातून हटण्यास तयार नाहीत.’’ अबकारी कराच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी सराफ असोसिएशनच्या वतीने सारसबागमधील गणेश मंदिरात महाआरती केली. आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे ५०० कारागिरांना असोसिएशनच्या वतीने धान्यवाटप करण्यात आले.
सराफांचे आंदोलन सुरूच राहणार
By admin | Published: March 17, 2016 3:21 AM