नीरा : सातारा-नगर राज्यमार्गावरील नीरा- मोरगावदरम्यान नीरा ते गुळुंचे रस्त्याचे गेल्या वर्षी काम करण्यात आले होते; मात्र वर्षभरातच या रस्त्यावर खड्डे पडले असून, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यात पाणी साचले आहे. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात वाढले आहे.गुळुंचे-नीरादरम्यानच्या रस्त्याचे चार किमीचे काम मागील दोन-तीन वर्षांपासून सतत करण्यात येत आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात ज्योतिर्लिंग वीटभट्टीच्या पुढील बाजूपासून नीरा डावा कालव्यापर्यंतचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित काम करण्यात आले; मात्र अवघ्या वर्षभरातच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडायला सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने लहान-मोठे अपघात दररोज होत आहेत. येथील कोळेवस्तीजवळ तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या नीरा केंद्राच्या पुढील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, रस्त्याच्या कडेने वाहणारे पाणी खड्ड्यात जमा होत असल्याने डबक्याचे स्वरूप आले आहे.खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात वाढले....नीरा डाव्या कालव्यावरील वरच्या बाजूला अनेक मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनावरील तोल जाऊन अपघात होत आहेत. एखाद्या वाहनचालकाचा वाहनांवरील ताबा सुटला, तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.बुवासाहेब मंदिराच्या पुढील बाजूस ज्युबिलंट कंपनीच्या पार्किंगच्या प्रवेशद्वाराच्या जवळील रस्ता खड्डेमय झाले आहे. तर बुवासाहेब चौकात मोठे खड्डे पडले आहेत. थेट पुढे पालखी तळाकडून पुढे लोणंदकडे जाणारा रस्ता अपघाताला निमंत्रणदेत आहे.लहानमोठे दोन-तीन फूट खोल खड्डे पडल्याने अपघात घडत असून, भविष्यात एखादा जीवघेणा अपघात घडू नये याकरिता वेळीच या रस्त्यावर डागडुजी करण्याची मागणी नागरिक करत आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवून त्यांची दुरुस्ती करणे, रस्त्यातील पुलांवर रिफ्लेक्टर बसविणे, दिशादर्शक फलक लावणे, साइडपट्ट्यांवरील पाणी जाण्यासाठी उतार करणे, रस्त्याच्या बाजूच्या साइडपट्ट्यांवरील काटेरी झुडपे काढून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
नीरा-मोरगाव रस्त्यावर साचली डबकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 1:18 AM