वारजे (पुणे) : वारजे तीन विठ्ठल नगर भागात टोळक्याने सोमवारी पहाटे रस्त्यावर लावण्यात आलेल्या सुमारे वीस-बावीस वाहनांची कोयता व तलवारीच्या साहाय्याने तोडफोड केली. तसेच येथील सामान्य नागरिकांच्या घरावर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले व दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वारजे माळवाडीपोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली.
सराईत गुन्हेगार अविनाश सुरेश गंपले उर्फ अव्या (वय २० रा. अमर भारत सोसा. वारजे), सत्यपाल पवन राठोड (वय २०, रा. विठ्ठल नगर), विशाल संजय सोनकर (वय २०, रा स्नेहा विहार, शिवणे) या तिघांना अटक केली असून, अजून एका अन्य अल्पवयीन साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी पहाटे दीड ते दोन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत अभिजीत धावणे (वय ३० रा. वारजे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी अभिजीत धावणे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. सोमवारी त्यांचे वडील गावावरून येणार होते. त्यांना घेण्यासाठी धावणे हे शिवाजीनगरला निघाले होते. गाडी घेऊन निघण्याच्या तयारीत असताना त्याच वेळेस आरोपी अविनाश व त्याचे साथीदार यशोदीप चौकाच्या दिशेने आरडाओरडा करत आले व आरोपींनी त्यांच्या हातात असलेल्या कोयता, बांबू व दगडाच्या साहाय्याने परिसरातील अनेक वाहने फोडली. गाडीत बसलेल्या धावणे यांची काच फोडल्यावर धावणे यांनी याबाबत जाब विचारला असता त्यावेळी टोळक्याने त्यांच्या अंगावर धावून त्यांना मारहाण करत व त्याच्या धाकाने त्यांच्या खिशातील चार हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. ‘तू मला ओळखत नाही का?, मला या परिसरात अव्या भाई म्हणतात’ असे म्हणून त्यांनी दमदाटी केली. बारा वाहने असली तरी या भागातील दुचाकी व चार चाकी मिळून सुमारे वीस ते पंचवीस गाड्या फोडल्याचा अंदाज आहे.
गुन्हा घडल्यावर लगेचच त्या रात्री रात्रपाळीवर ड्युटीवर हजर असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी मार्शल व इतर कर्मचाऱ्यांना सूचना करत मोठ्या शिताफीने यातील एका आरोपीला अटक केल्यावर, काही वेळाने गांजा व दारूच्या नशेत असलेल्या सर्वांनाच ताब्यात घेण्यात यश आले. अधिक तपास सहायक निरीक्षक आळेकर करीत आहेत.
त्याच रात्री अजून एक गुन्हा
या चार आरोपींनी त्याच रात्री यापूर्वी अजून एक गुन्हा केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अमर भारत सोसायटी येथे सद्गुरु किराणा स्टोअरजवळ फिर्यादी राजन दास (वय १८) या कारपेंटरचे काम करत असलेल्या व्यक्तीस जबरदस्ती कोयता व बांबूच्या साह्याने धमकावून मारहाण करत त्यांच्या त्यांच्या खिशातील रोख सातशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. येथील आसपासच्या नागरिकांच्या दिशेने कोयता भिरकावून दहशत निर्माण केली म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.