खून, दरोडा, हत्यारे जवळ बाळगणे, धमकी, बेकायदेशीर जमाव एकत्र करणे, असे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आकाश भरत थोरात (वय २७) असे या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सन २०१५ पासून खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव एकत्र करून गुन्हे करणे, बंदूक व घातक हत्यारे जवळ बाळगणे, एखाद्याच्या मालमत्तेचे नुकसान करणे, धमक्या देणे असे गुन्हे करत होता. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. अनेकदा कारवाई होऊनही त्यामध्ये सुधारणा झाली नाही. सतत घातक हत्यारे जवळ बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असे. नागरिक घाबरून तक्रारही नोंदवण्यास पुढे येत नव्हते. त्या पार्श्वभूमीवर आरोपीला ताब्यात घेण्याचा आदेश निघाल्याबरोबरच तो फरार झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. गोपनीय खबऱ्यांमार्फत आरोपी देहू रस्ता परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली. त्या क्षणी पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे आणि त्यांच्या पथकाने गुन्हेगाराला ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात आणले आहे.