पुणे : मोटारसायकलवरून हेल्मेट घालून बंद असलेल्या घरांची रेकी करायचे आणि अत्याधुनिक साधनांचा वापर करून घरफोडी करून आरोपी व त्याचे साथीदार घरातील रोकड व मौल्यवान वस्तू लुटून न्यायचे, अशी आरोपींची ‘मोडस ऑपरेंडी’ (गुन्ह्याची कार्यपद्धत) असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संगमवाडी येथील दोन बंगल्यांमध्ये चोरी करण्यासाठी या आरोपींना मोटारसायकल उपलब्ध करून देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली. न्यायालयाने त्याला १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
व्यास कडवा मन्नावत (वय ३८, रा. डोंगरवाडी, लोणावळा, मूळ रा. गोध्रा, गुजरात) असे पोलीस कोठडी झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर व त्याच्या अन्य साथीदारांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हरिश्चंद्र उर्फ राजू मनोहर मोझे (वय ४९, रा. संगमवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही चोरीची घटना ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान संगमवाडीतील राम मंदिराजवळच्या दोन बंगल्यांमध्ये घडली. चोरी झालेले दोन्ही बंगले माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या दोन पुतण्यांचे आहेत.
फिर्यादी व त्यांचे बंधू आपल्या कुटुंबीयांसमवेत बाहेरगावी गेले होते. ते परतले असता, दोन्ही बंगल्यांमध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी दोन्ही बंगल्यांच्या दरवाजाचे कडीकोयंडे तोडून सोन्या-चांदीचे दागिने, महागडी घड्याळे व रोकड असा सुमारे ५३ लाख ४६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला, असे फिर्यादीत नमूद आहे. हा गुन्हा करण्यासाठी वाहन उपलब्ध करून देणाऱ्या मन्नावत याला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. मन्नावतच्या ताब्यातून एक मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, त्याने ही मोटारसायकल मुख्य आरोपींना गुन्हा करण्यासाठी व गुन्हा केल्यानंतर वापरण्यास दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चोरी करण्यापूर्वी रेकी करण्यासाठी मुख्य आरोपीने वापरलेली मोटारसायकल मन्नावतने स्वत:च्या ताब्यात घेऊन त्याला दुसरी मोटारसायकल दिली आहे. ही मोटारसायकल, चोरीचा ऐवज व घरफोडीसाठी चोरट्यांनी वापरलेली साधने जप्त करायची आहेत. आरोपी व त्याचे साथीदार परराज्यातील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्या संघटित टोळीने राज्यात घरफोडीचे गुन्हे केले आहेत, त्याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
.....