पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील वाहन चोरी करणा-या सराईत चोरांना गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉड दक्षिण विभागाने जेरबंद केले. त्यांच्याकडून २ लाख ५ हजार किंमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.पवन सोनाजी इंगळे ( वय २५ रा. सध्या भोंडवे कॉर्नर, गवळी यांची खोली, वाल्हेकरवाडी चिंचवड मूळगाव मु.कोयाळी ता. रिसोड जि. वाशिम),मोहन भिकाजी कांबळे ( वय २४) आणि नेताजी नारायण घोडके(वय ३५ रा.मूळ गुंडोपथ दबका ता मुखेड जि. नांदेड) यांना अटक करण्यात आली आहे. कोथरूड वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हददीत गस्त घालत असताना तीन व्यक्ती एक चोरीची दुचाकी कात्रजच्या दिशेने वाहन विक्रीसाठी घेऊन चालले असल्याची माहिती कळली. चांदणी चौक येथे सापळा लावून ट्रिपल सीट चाललेल्या संशयितांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते कात्रजच्या दिशेने पळून जायला लागल्याने त्यांचा पाठलाग करून चौकशी केली असता गाडीची कागदपत्रे नसल्याचे आणि वाहनाच्या मालकीबाबत काहीएक माहिती नसल्याचे समोर आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. गाड्यांच्या बनावट चाव्या तयार करून ते गाडी चोरून विकत होते. आरोपी इंगळे आणि कांबळे हे मावसभाऊआहेत. खेड पोलीस ठाण्यातही त्यांच्यावर ३०५ व ३९९ चे गुन्हे दाखल आहेत. आरोपींना ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा स्कॉड दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, सहायक पोलीस फौजदार राजेंद्रसिंग चौहान, रविंद्र कदम, पोलीस हवालदार भालचंद्र बोरकर, सुनील चिखले, गणेश साळुंके, संजय बरकडे, अजयउत्तेकर, पोलीस कॉंस्टेबल कैलास साळुंके, रमेश चौधर, राकेश खुणवे, प्रवीण पडवळ, विवेक जाधव, नितीन सवळ व चालक गंगावणे यांनी ही कामगिरी केली.
सराईत वाहनचोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:28 AM