पुणे : पं. सी. आर. व्यास यांच्या शिष्या अपर्णा केळकर यांच्या स्वरमैफलीने रसिकांची मने जिंकली. ‘सरस सूर गाऊँ, मन रिझाऊँ, या पंडित व्यास यांनी स्वत: रचलेल्या विलंबित एकतालातली रचना आणि द्रुत तीनतालात, ‘देख चंदा नभ निकास आयो’, या रचनांच्या सादरीकरणातून त्यांनी सुरेल भावनिर्मिती केली.निमित्त होते, ज्येष्ठ गायक आणि वाग्येयकार पंडित सी. आर. व्यास यांच्या ९२ जयंतीनिमित्त आयोजित ‘चिंतामणी जयंती समारोहाचे.’ पं. व्यास बुवांबरोबरच त्यांचे परममित्र पं. चिदानंदजी नगरकर यांनी रचलेला राग कौशिकीरंजनी केळकर यांनी सादर केला. ज्यामध्ये मध्य झपतालातली रचना व द्रुततीनतालातली रचनांचा समावेश होता. आवाजातील माधुर्य, तिन्ही सप्तकातली सहजता, तसेच तानेतली स्पष्टता यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना हार्मोनिअमवर सुयोग कुंडलकर व तबल्यावर चारुदत्त फडके, तर तानपुऱ्यावर स्वानंदी केळकर हिने सुरेख साथसंगत केली. त्यानंतर रामदास पळसुले यांचे अप्रतिम एकल तबलावादन झाले. त्यांनी तीनताल पेश केला. कार्यक्रमाचे निवेदन मकरंद केळकर यांनी केले. (प्रतिनिधी)
सरस सूर गाऊॅ...मन रिझाऊॅ...
By admin | Published: November 11, 2016 1:57 AM