पुणे : मंगळवार पेठेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर मुलीच्या भावाला फोन करून धमकी देणा-या आणि पुणे पोलिसांना पकडून दाखविण्याचे आव्हान देणारा गुंड श्वेतांग निकाळजे याला शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने भोर येथे अटक केली.श्वेतांग भास्कर निकाळजे (वय २६, रा. भीमनगर, मंगळवार पेठ) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे़ शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आतापर्यंत १२ ते १५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे़ त्यामध्ये दोन खून, दरोडा, दरोड्याची तयारी, अग्नीशस्त्रे बाळगणे आणि खंडणी उकळणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याला सप्टेंबर २०१५ मध्ये एक वर्षांसाठी पुणे शहरातून तडीपारही करण्यात आले होते.श्वेतांग निकाळजे याने मंगळवार पेठेतील एका अल्पवयीन मुलीचे ७ एप्रिल २०१८ रोजी अपहरण केले. त्यानंतर त्याने तिच्या भावाला फोन करुन मी तुझ्या बहिणीशी लग्न करणार आहे़ तुम्ही पोलिसांकडे तक्रार दिली तर मी तुम्हाला संपवेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी तिच्या वडिलांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल करताना संबंधित पोलीस अधिका-यांनी तो योग्यरित्या दाखल करून घेतला नसल्याचा आरोप करीत तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. याच्या सुनावणीला पोलीस अधिकारी न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्याची यायालयाने याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहआयुक्त रवींद्र कदम हे पुढील तारीखेला न्यायालयात उपस्थित राहिले. त्यांनी उच्च न्यायालयात या प्रकरणाचा तपास हा गुन्हे शाखेकडे देण्यात येईल, असे न्यायालयाला आश्वासन दिले होते. त्यानुसार हा तपास गुन्हे शाखेकडील दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तपासादरम्यान श्वेतांग निकाळजे याला आश्रय देणा-या चौघांना पोलिसांनी अटक केली.ही मुलगी अल्पवयीन असल्याने श्वेतांग निकाळजे हा ती सज्ञान होईल, तेव्हा १८ जुलै रोजी विवाह करणार होता. त्यापूर्वी पुणे पोलिसांनी मला अटक करुन दाखवावी, असे आव्हान दिले होते. त्यामुळे पुणे पोलिसांना आव्हान देणा-या निकाळजेचा दरोडा प्रतिबंधक पथकाबरोबरच गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथकही शोध घेत होते.या पथकातील पोलीस कर्मचारी सचिन जाधव आणि गजानन सोनुने यांना श्वेतांग निकाळजे हा भोर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार माहितीची खातरजमा केल्यावर पोलिसांनी रविवारी दुपारी सापळा रचला होता. या अल्पवयीन मुलीसह तो तेथे आल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी त्याला जेरबंद केले.गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले-पाटील, सहाय्यक निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम, पोलिस कर्मचारी सचिन जाधव, गजानन सोनुने, सुधाकर माने, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, रिजवान जिनेडी, तुषार खडके, तुषार धामणकर, मेहबुब मोकाशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांना आव्हान देणाऱ्या सराईत गुंडाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2018 10:43 PM