पुणे : पुण्यात 'सारथी बचाव' आंदोलन सुरु आहे. राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सारथी संस्थेच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्याभरातून शेकडो विद्यार्थी पुण्यात दाखल झाले असून अनेक ठिकाणी भगवे झेंडे आणि सारथी बचाव आंदोलनाचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.
'मराठा, कुणबी समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेबाबत (सारथी) विविध आदेश काढून, संस्थेला बदनाम केले जात आहे,' असा आरोप छत्रपती संभाजी राजे यांनी केला असून लाक्षणिक उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. याचबरोबर, या आंदोलनाबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट केले होते. सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे, विशेष म्हणजे या संस्थेचे उदघाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते, असे ट्विट छत्रपती संभाजी राजे यांनी केले होते.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सारथी संस्थेतील अनेक वादविवाद समोर येत आहेत. त्यासंदर्भात छत्रपती संभाजी राजे यांनी दोन दिवसांपूर्वी सारथी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी छत्रपती संभाजी राजे म्हणाले, सारथी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्याची चौकशी व्हावी पण ती प्रामाणिकपणे व योग्य अधिकाऱ्यांमार्फत होणे गरजेचे आहे. सारथी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांना संपूर्ण माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर त्वरीत बैठक घेवून यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितले आहे.
(सारथी संस्था बंद पडता कामा नये : खासदार छत्रपती संभाजी राजे )