पुणे : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांचे हिंदुस्थानातील मुत्सद्दी व दिल्लीत मराठा राज्य अबाधित ठेवणारे सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांच्या गौरवार्थ दिला जाणारा ‘सरदार अंताजी माणकेश्वर राष्ट्रीय पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. बेटी बचाव अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने एकमताने या पुरस्कारासाठी मोदींची निवड केली. न्यायाधीश शुभदा बक्षी, ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम, ज्येष्ठ साहित्यिका व रंगकर्मी डॉ. संध्या देशपांडे, लेखक व इतिहासतज्ज्ञ डॉ. सदाशिव शिवदे व अॅड. सुभाष शाळिग्राम यांच्या समितीने निवड केली. सरदार गंधे यांच्या वंशजांनी स्थापन केलेल्या व संपूर्ण देशातील विविध प्रदेशांत कार्यरत स्मृती न्यासातर्फे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. हा ‘कॅशलेस’ पुरस्कार असून, त्यात सुवर्णाचे मानचिन्ह, महावस्त्र व अंताजींच्या पगडीचा समावेश असल्याचे प्रमुख विश्वस्त योगेश्वर गंधे व सतीश गंधे यांनी सांगितले.
सरदार गंधे पुरस्कार नरेंद्र मोदींना जाहीर
By admin | Published: December 22, 2016 2:34 AM