जेजुरी : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी आपापले कुणबी दाखले तयार करून घेण्याचा सपाटा लावला असल्याने तालुक्यात सरदार, इनामदार, पाटील, देशमुख आता कुणबी दाखले घेऊन निवडणुका लढविणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. यामुळे इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांवर अन्याय होणार असल्याची भावना जोर धरू लागली आहे. पुरंदर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आरक्षणे जाहीर झाल्यानंतर कुणबी दाखले मिळवणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. यात इच्छुकांची धावपळ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यात तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा आणि मनसेचे इच्छुक आहेत. त्याशिवाय अनेक अपक्षही आपले कुणबी दाखले मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.कुणबी दाखले मिळवणे हा मराठा कुणबी समाजाचा कायदेशीर हक्क आहेच. तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मात्र निवडणुकीसाठीच असे दाखले मिळवणे या बाबीची चर्चा होत असतेच. तालुक्यातील मतदारांचा विचार करता सर्वात जास्त मराठा समाजाची संख्या आहे. त्याखालोखाल इतर मागासवर्गींयांची संख्या आहे. जिल्हा परिषदेच्या सध्या चारही गट खुल्या प्रवर्गासाठी होती. आगामी निवडणुकीसाठी हे चारही गट इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) राखीव झालेले आहेत. पंचायत समितीचे तीन गण ओबीसी साठी राखीव आहेत. यामुळे उमेदवारीचे प्रबळ दावेदार व गटावर वर्चस्व असणाऱ्यांची चांगलीच गोची झाली होती. मात्र त्यांना कुणबी दाखले मिळत असल्याने निवडणुकीसाठी ते प्रबळ दावेदार झाले आहेत. यातच सत्ता हस्तगत करण्याचे सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न असल्याने या कुणबी दाखले मिळवलेल्या उमेदवारांना ते ते राजकीय पक्ष संधी देणार का? या इच्छुकांत कोणी इनामदार आहे, कोणी सरदार आहेत, तर कोणी पाटील, देशमुख म्हणून मिरवणारेही आहेत. निवडणुकीसाठी ते आता कुणबी होणार आहेत आणि संधी दिलीच तर ओबीसी इच्छुकांच्या काय प्रतिक्रिया राहतील, हीच चर्चा सुरू झाली आहे. (वार्ताहर)
सरदार, इनामदार, पाटील, देशमुख झाले ‘कुणबी’
By admin | Published: December 31, 2016 5:25 AM