लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “आगामी चौऱ्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलन दिल्लीत आयोजित करण्यासंदर्भात आम्ही माघार घेतलेली नाही. लसीकरणामुळे कोरोनाचे संकट एप्रिलपर्यंत आटोक्यात येणार असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनापासून (१ मे) दिल्लीत तीन दिवसीय संमेलन घेण्याची आमची तयारी आहे,” असे पत्र ‘सरहद्द’चे संस्थापक संजय नहार आणि नवी दिल्लीतील संमेलन संयोजक अविनाश चोरडिया यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांना पाठवले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासंदर्भात चर्चा करण्यासाठी साहित्य महामंडळाची येत्या ३ जानेवारीला औरंगाबादेत बैठक आहे. संंमेलनाच्या आयोजनासाठी नाशिककडून दोन, अंमळनेर, परभणी (सेलू) आणि दिल्ली अशा ठिकाणांहून महामंडळाकडे निमंत्रणे आली आहेत. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर यंदाचे संमेलन राज्यातच व्हावे, असा साहित्य वर्तुळाचा कल आहे. यामुळे औरंगाबादच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर सरहद्द संस्थेने दिल्लीत संमेलन घेण्याचा इरादा मजबूत असल्याचा दावा करणारे पत्र महामंडळाला पाठवले आहे.
“आगामी संमेलन हे ३१ मार्चपूर्वीच झाले पाहिजे असे काही सदस्यांचे म्हणणे आहे. मात्र घुमानचे (पंजाब) संमेलन सन २०१५ मध्ये ३ ते ५ एप्रिल दरम्यान झाले होते. त्यामुळे आगामी संमेलन १ ते ३ मे दरम्यान घेणे अडचणीचे ठरु नये. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे, सर्व मागण्यांचा आवाज देशाच्या राजधानीत उठविता येणे शक्य आहे. यातच १४ जानेवारीला ‘पानिपत’ युद्धाला २६० वर्षे पूर्ण होत आहेत. या दृष्टीने येत्या महाराष्ट्र दिनी दिल्लीत संमेलन घेणे औचित्यपूर्ण ठरणार आहे. तरी निर्णय घेण्याचा आपला अधिकार आहे. या संकटकाळात दिल्लीत संमेलन घ्यायचे असेल तर एकमताने व सर्वांना विश्वासात घेऊन झाले तरच यशस्वी होऊ शकते. आपण योग्य तो निर्णय घ्यावा,” असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
.