राजगुरूनगर: रिव्हॉल्वर वापरण्यासाठी पोलिसांकडून रीतसर परवाना मिळावा यासाठी आधार म्हणून थेट जीवघेणा हल्ला झाल्याचे कुभांड खेड तालुक्यातील एका नवनिर्वाचित सरपंचाने रचल्याच्या प्रकाराची चर्चा संबंधित गावासह खेड तालुक्यात आहे. खेड पोलीस ठाण्यात (Khed Police station) याबाबत दबक्या आवाजात चर्चा आहेत. मात्र या सरपंचाला सहकार्य करावे असा जवळच्या तालुक्यात असलेल्या मोठ्या नेत्यांचा अलिखित सांगावा असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी होऊन देखील कोणत्याही प्रकारची जाहीर वाच्यता केलेली नाही.
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावच्या तरुण तुर्क व अतिउत्साही सरपंचावर सप्टेंबर महिन्यात रात्री रस्त्यावर खुनी हल्ला झाला. खेड पोलिसांत त्याची तक्रार दाखल आहे. सरपंच व त्यांचे एक सहकारी रात्री दहा वाजता एका अरुंद रस्त्यावरून त्यांच्या चारचाकी मोटारीने घरी येत होते. अचानक समोरून दोन दुचाकी मोटारसायकल आल्या. त्या आडव्या लाऊन तोंड बांधलेले चार जण जवळ आले. त्यांनी दगडाने मोटारीची काच फोडून सरपंचांवर पिस्तुल रोखले. मात्र चारचाकी वेगात पळवून सरपंचाने स्वतःची सुटका करून घेतली. असे तक्रारीत म्हटले होते. या प्रकारात कोणाला साधे खरचटले सुद्धा नाही. दोन मोटारसायकली आडव्या लावल्यावर अरुंद रस्त्यावर चारचाकी जोरात सुरू करून पुढे कशी जाऊ शकते, हा देखील संशोधनाचा विषय आहे.
इतके झाल्यावर शिवाय हल्लेखोर फक्त काच फोडून शांतपणे निघून गेले का? रात्री दहा वाजता घटना घडली मात्र जवळ लोकवस्ती असलेल्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी ही वाहने पाहिली नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. गेले अडीच महिने तपास केला मात्र पोलिसांना संशयास्पद काहीच मिळून आलेले नाही. त्याबाबत पोलीस काही सांगत नाहीत. मुळात आपल्या जीवाला धोका संभवतो हे दाखवण्यासाठी सरपंचाने हा तथाकथित बनाव केला होता. असे लोक तेव्हापासून आतापर्यंत याप्रकरणी बोलत आहेत.
गावात अटीतटीच्या निवडणुकीत वाद निर्माण झाले होते. अशा स्थितीत सरपंच झाल्यावर जोखीम नको म्हणून सुरक्षेसाठी अगोदर पिस्तुल परवाना मागणी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याला पुष्टी मिळावी म्हणून हा बनाव पुढे करण्यात आला असावा, अशी पुर्व भागात चर्चा आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी गावातील व परिसरातील अनेकांना चौकशी साठी बोलावून नाहक त्रास दिला. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचा गडद रंग भरण्यात आल्याने काही जण अजूनही आपल्यावर काही बालंट येईल या भीतीने त्रासलेले आहेत.
संबंधित प्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे. अडीच महिन्यात कोणत्याही प्रकारचे धागेदोरे मिळालेले नाहीत. मात्र या तपासात काहीच निष्पन्न झाले नाही. प्रकार घडण्यापूर्वी तक्रारदाराचा पिस्तुल परवाण्यासाठी अर्ज दाखल असल्याचे समजते. त्याअनुषंगाने सुद्धा चौकशी सुरु आहे.सतिश गुरव, पोलीस निरीक्षक-खेड