सीएसआर फंडाचे आमिष दाखवून ग्रामपंचायत सरपंचांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ठकबाजाला पुणे ग्रामीण
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी अटक केली आहे. याप्रकरणी अनिरुद्ध बाबासाहेब टेमकर, वय ३२ वर्षे, रा. कान्होबावाडी, गंगापूर, ता. गंगापूर, औरंगाबाद या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी माहिती दिल्यानुसार, शिरूर तालुक्यातील आंबळे गावातील सरपंच सोमनाथ शिवाजी बेंद्रे यांना दि. ९ जुलै रोजी त्यांचे मोबाईलवर अनोळखी इसमाचा फोन येऊन त्याने आपले नाव अनिरुद्ध टेमकर असे सांगितले आणि ‘मी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनी’चा सी.एस.आर कन्सल्टंट बोलत आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीकडून सी.एस.आर. फंड गावाकरिता देणार आहे. त्याकरिता गावचा कोड ओपन करण्यासाठी त्यांचे बँक ऑफ बडोदा या बँकेचे खात्यावर दहा हजार रुपये फोन पेच्या माध्यमातून त्यांचे मोबाईल नं. ९०११४३९८८८ वर पाठविणेस सांगितले. त्यापैकी नऊ हजार पाचशे रूपये चोवीस तासांत रिफंड होतील." असे सांगून सोमनाथ बेद्रे यांचे व्हॉट्सअॅपवर गावाकरिता सी.एस.आर.मधून कोण-कोणते काम केले जाणार याची माहिती पाठविली. कामाचे स्वरूप व गावाच्या विकासाकरिता सोमनाथ बेंद्रे यांनी दहा हजार रुपये फोन पे केले होते. परंतु चोवीस तासांत नऊ हजार पाचशे रुपये रिफंड झाले नाहीत व अनिरुद्ध टेमकर यांना संपर्क केला असता त्यांचे फोनवरील बोलणे समाधानकारक वाटले नाही. त्यादरम्यान शिरूर तालुक्यातील आंबळे गावाजवळील आंधळगाव, शिरसगाव काटा, गणेगाव दुमाला, कुरुळी, कोळगाव डोळस या गावांतील सरपंचांची देखील अशा प्रकारे फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने सोमनाथ बेंद्रे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे दि.१० जुलै २०२१ रोजी फिर्याद दाखल केली.
घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना सूचना करून बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, सचिन गायकवाड, पोलीस नाईक अजित भुजबळ, मंगेश थिगळे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जावळे यांचे तपास पथक नेमण्यात आले होते. दाखल गुन्ह्यातील आरोपी अनिरुद्ध टेमकर याची माहिती प्राप्त करून घेत हा आरोपी कान्होबावाडी गंगापूर (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील राहणार असून, तो आज रोजी औरंगाबाद येथून मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळाली. तपास पथक हे कोंढापुरी परिसरात हायवे रोडवर असताना आरोपी हा शिक्रापूर-चाकण रोडने मुंबईकडे निघाला असल्याची माहिती मिळाली. आरोपीचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव अनिरुद्ध बाबासाहेब टेमकर असल्याचे सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली देऊन शिरूर तालुक्यातील आंधळगाव, शिरसगाव काटा, गणेगाव दुमाला, कुरूळी, कोळगाव डोळस व इतर ग्रामपंचायतीच्या सरपंचांना सीएसआर फंडाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीला शिरूर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
अशा प्रकारे आणखी काही ग्रामपंचायतींची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याबाबत पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांनी आवाहन केले आहे.