पुणे : नेत्याने एखादी गाेष्ट अवलंबली तर त्याचे अनुकरण लाेक करत असतात. माेदी सत्तेवर येताच त्यांनी स्वच्छ भारत अभियानाची घाेषणा केली. या अभियानावरुन प्रेरणा घेत साेरतापवाडीचे सरपंच आणि भारतीय जनता युवा माेर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चाैधरी यांनी आपल्या गावात या अभियानाला सुरुवात केली. गेले 85 आठवडे दर रविवारी सकाळी 6 वाजता उठून गावकऱ्यांना साेबत घेत गावाची स्वच्छता करतात. स्वतः झाडू हातात घेत ते परिसर स्वच्छ करतात. रविवारी ( 13 जानेवारी) त्यांचे लग्न हाेते. लग्नाच्या दिवशी तरी सरपंच साहेब स्वच्छतेला येणार नाहीत असे गावकऱ्यांना वाटले परंतु चाैधरी हे लग्नाच्या दिवशी सकाळी सुद्धा गावाची स्वच्छता करण्यासाठी हजर झाले. सकाळी गावची स्वच्छता अन संध्याकाळी ते भाेवल्यावर चढले.
सुदर्शन यांचा विवाह मेदनकरवाडीच्या सरपंच आणि भारतीय जनता युवा माेर्चाच्या प्रदेश सचिव प्रियांका मेदनकर यांच्याशी झाला. प्रियांका आणि सुदर्शन हे दाेघेही भाजपाचे सरपंच आहेत. प्रियांका यांनी आपल्या गावात विविध याेजना राबविल्या आहेत. गावाला डिजिटल साक्षर त्यांनी केले. तसेच संपूर्ण गावत वायफाय सुविधा त्यांनी सुरु केली आहे. तसेच मुली व महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन माेफत देण्याचा उपक्रमही त्या राबवितात. सुदर्शन आणि प्रियांका या दाेघांनाही समाजकार्याची माेठी आवड आहे. रविवारी या दाेघांचा विवाह पार पडला.
सुदर्शन हे गेली 85 आठवडे गावात स्वच्छता उपक्रम राबवित आहेत. गावकऱ्यांसाेबत ते स्वतः दर रविवारी सकाळी गावाची स्वच्छता करतात. गावचा सरपंचच स्वच्छतेसाठी सकाळी हजर हाेत असल्याने गावकरीही त्यांना साथ देतात. यापुढेही हे अभियान असेच चालू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.