सरपंच ते आमदार! बापूसाहेब पठारे पुन्हा वडगाव शेरीच्या रिंगणात; महायुतीचा उमेदवार ठरेना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 09:00 PM2024-10-24T21:00:40+5:302024-10-24T21:02:39+5:30
२००९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार झाले. काही कारणास्तव मधल्या काळात ते एक निवडणुकापासून लांब राहिले.
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी यादी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. ४५ जणांच्या या यादीत जवळपास सर्वच प्रमुख मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. बहुचर्चित अशा वडगाव शेरी मतदारसंघातून अखेर बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सरपंच ते आमदार असा प्रवास राहिलेले बापूसाहेब पठारे या निमित्ताने पुन्हा एकदा वडगाव शेरीच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
खराडीच्या सरपंच पदापासून बापूसाहेब पठारे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. नंतर ते पंचायत समिती, जिल्हापरिषद सदस्य आणि पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. नगरसेवक असताना त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष पद देखील भूषवले. त्यानंतर २००९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार झाले. काही कारणास्तव मधल्या काळात ते एक निवडणुकापासून लांब राहिले. या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षातही प्रवेश केला. मात्र आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात त्यांनी प्रवेश केला असून यंदा ते विधानसभेच्या रिंगणात आहे.
दरम्यान उमेदवारी जाहीर होताच बापू पठारे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, शरद पवारांनी यापूर्वी देखील माझ्यावर विश्वास व्यक्त केला होता आणि आत्ता देखील माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. वडगांव शेरी मतदार संघातील जनतेचाही माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे यंदा वडगाव शेरीतून आमदार मीच असेल असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केला. बापूसाहेब पठारे वडगाव शेरी मतदार संघाची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर असेल असेही स्पष्ट केले. मागील दहा वर्षात वडगाव शेरीतील नागरिकांची कसे हाल झाले याकडे त्यांनी लक्ष वेधले. वडगाव शेरी मतदारसंघात वाहतूक कोंडीचा ज्वलंत प्रश्न असून तो सोडविण्यावर भर असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी बोलताना आतापर्यंत वडगाव शेरी मतदारसंघात सर्वाधिक निधी मी चांगला असा दावा केला होता. यावर उत्तर देताना बापूसाहेब पठारे म्हणाले, त्यांनी आणलेला निधी फक्त कागदावर आहे. मतदार संघात तो कुठेही दिसत नाही. एवढा निधी आणला तर तो गेला कुठे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मागील काही वर्षात मतदार संघात म्हणावी तशी विकास कामे झाली नाहीत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे त्रस्त झालेले नागरिक नक्कीच बदल घडवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.