शिरगाव : किरकोळ भांडणाचा राग मनात धरून सांगवडे येथील सरपंच दीपाली लिमण यांचे पती नवनाथ लिमण (वय ३२) यांचा धारदार शस्त्राने वार करून रविवारी मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिमण यांचे आरोपीशी चार दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. भैरवनाथ उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून भजनाच्या कार्यक्रमासाठी मंदिरात उपस्थित होते. भजन संपताच लिमण सहकाऱ्याबरोबर मंदिराजवळ बसले असताना चार ते पाच आरोपी जीपमधून (एमएच १४ एफएक्स ०३७) घटनास्थळी आले. त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. डोक्यावर, पोटावर, हातावर तलवार, कोयता व लाकडी दांडक्याने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने लिमण यांना उपचारासाठी सोमाटणे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याबाबत विश्वास लिमण यांनी फिर्याद दिली. पाच जणांवर गुन्हा दाखल केला. मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी ससून रुग्णालय, पुणे येथे पाठविला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके तयार करून रवाना करण्यात आली आहेत. (वार्ताहर)
सरपंचाच्या पतीचा सांगवडेत खून
By admin | Published: April 24, 2017 4:54 AM