पुणो : विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून हडपसरजवळील होळकरवाडीच्या सरपंच मंगल झांबरे यांचा मुलगा नितीन झांबरे (26, रा. होळकरवाडी) याचा गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून करण्यात आला. राजकीय वैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांनी दिली.
आकाश झांबरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राहुल तुपे, योगेश होळकर यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नितीनची आई होळकरवाडी गावची सरपंच आहे. नितीन व त्याची आई काँग्रेस पक्षाचे काम करतात. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या घरासमोर काही जणांनी गाडय़ा आणून गोंधळ घातला होता. त्या वेळी शिवसेनेचे कार्यकर्ते रवी झांबरे आणि वरुण झांबरे या दोघांसोबत त्याचे भांडण झाले होते. आरोपी तुपे आणि होळकर हे दोघेही रवी आणि वरुणचे नातेवाईक आहेत. भांडणाचा राग मनात धरून राहुल तुपे आणि वरुण यांनी नितीनचा काटा काढायचे ठरवले होते. (प्रतिनिधी)