योगेश पांडे
सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह मदनदासदेवींना पुण्यात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मदनदास देवी यांचे सोमवारी बंगळुरू येथे निधन झाले होते. पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
मदनदास देवी यांच्या निधनानंतर संघ वर्तुळात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी शब्दांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत मदनदास देवी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले होते. त्यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते व त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. सर्व स्वयंसेवक व त्यांच्या कुटुंबीयांना हा धक्का सहन करण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. तर मदनदास देवी यांच्या निधनामुळे आम्ही आमचे ज्येष्ठ सहकारी गमावले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत संघ योजनेनुसार देण्यात आलेले ते पहिले प्रचारक होते. त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. संघर्षाच्या काळात त्यांनी अनेकांच्या आव्हानांचा सामना केला. त्यांची शिस्त, निरीक्षण शक्ती आणि सहजपणे कुणाशीही संवाद साधण्याचे कौशल्य या गोष्टी प्रेरणादायक होत्या. सुखदु:खाची चिंता न करता कर्तव्याच्या मार्गावर सतत समोर जात राहणे याचा आदर्शच त्यांनी प्रस्थापित केला होता, अशी भावना सरसंघचालकांनी व्यक्त केली.