पुणे : गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाने (दक्षिण विभाग) तीन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत सोनसाखळी चोराला जेरबंद केले आहे. तो तब्बल ५९ गुन्ह्यांमध्ये फरार असून त्याला ओरिसातील नवपाडा जिल्ह्यामधून अटक करण्यात आली आहे. ११ साखळी चोरीच्या गुन्ह्यांतील ७ लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी गुरुवारी दिली.मम्मू ऊर्फ महंमदअली अजिज इराणी ऊर्फ जाफरी (वय २८, मूळ रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, सध्या रा. नुराणी चौक, करिया रोड, जि. नवपाडा, ओरिसा) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून त्याचा साथीदार इम्रान फिरोज इराणी याचा शोध सुरु आहे. आरोपींनी शहरामध्ये विविध ठिकाणी सोनसाखळी चोऱ्या केल्या आहेत. जाफरीची आई मूळची ओरिसातील असून तो तेथील नवपाडा जिल्ह्यात आश्रयास गेल्याची माहिती तत्कालीन पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांना मिळाली होती. त्यानुसार हवालदार राजनारायण देशमुख, गणेश साळुंके, विठ्ठल बंडगर आणि कैलास साळुंके यांच्या पथकाने ओरिसामधून सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीमध्ये शहरात आणखी ११ साखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली. ही कारवाई उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दिवाकर पेडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सराईत सोनसाखळी चोरटा गजाआड
By admin | Published: October 14, 2016 5:04 AM