जेजुरी: जेजुरी नगरीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र जुलै महिन्यात चार वेळा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आता पुन्हा एकदा सोमवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार असून त्या अनुषगाने पालखी मैदानाची पाहणी करण्यात आली असून कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत शासन आपल्या दारी तसेच तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विकास कामांचे भूमिपूजन या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते मात्र जुलै महिन्यात सतत अडचनी आल्याने सलग चार वेळा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जेजुरीच्या पालखी मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला होता . यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाच्या वतीने तयारी करण्यात आली होती.सुमारे एक महिना शासकीय यंत्रणा राबत होती. मात्र कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने भव्य मंडप काढण्यात आला होता.
दिनांक ७ रोजी जेजुरीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार असल्याने शासकीय यंत्रणेची लगबग सुरू झाली आहे. शुक्रवार दिनांक ४ रोजी जेजुरीच्या पालखी तळाची पाहणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक मिलिंद पाटील,उप जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनिल पवार,पुरंदरचे तहसीलदार विक्रांत राजपूत,पोलीस उपविभागीय आधिकरी तानाजी बरडे,पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर,तसेच वाहतूक विभाग,सार्वजनिक बांधकाम,कृषी विभाग आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.