पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना न्यायालयाने शनिवारी पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांची विश्रामबाग पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. तेथे डी. एस. कुलकर्णी यांना चक्कर आल्याने तातडीने ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ससून रुग्णालयाने दिली आहे.
डी़ एस़ कुलकर्णी यांना रात्री दहा वाजता विश्रामबाग पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. त्यांना जेवण देण्यात आले परंतु, त्यांनी ते घेतले नाही. रात्री साडेअकराच्या दरम्यान त्यांना चक्कर आल्याने ते खाली बसले, त्यांचे वय लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात हलविले.
याबाबत ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी सांगितले की, साधारण सव्वा बाराच्या सुमारास डी. एस. कुलकर्णी यांना ससून रुग्णालयात आणण्यात आले, तेव्हा ते बेशुद्ध होते. त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांचे सिटी स्कॅन, एनजीओग्राफी तसेच अन्य तपासण्या करण्यात आले, त्याचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. आता त्यांचा व्हेंटिलेटर काढण्यात आला असून त्यांना कृत्रिम श्वासोश्वास देण्यात येत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, डी. एस. कुलकर्णी यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याने पोलीस कोठडी मिळूनही पोलिसांना त्यांच्याकडे चौकशी करणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांची पोलीस कोठडीचे दिवस वाया जाणार असल्याने ती सरेंडर करुन ते बरे झाल्यानंतर पोलीस कोठडी घेण्यात येणार असल्याचे समजते. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिका-यांशी चर्चा करुन पोलीस अंतिम निर्णय घेणार आहेत.