पुणे: ससून रुग्णालय प्रशासनाने परिचारिका संघटनेच्या १० कार्यर्त्यांच्या बदल्या आकसापोटी केल्याच्या निषेधार्थ परिचारिकांनी येत्या सोमवारी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. रुग्णालयातील सुमारे ४०० ते ५०० परिचारिका संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
विद्यावेतन वाढीसह विविध मागणीसाठी असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न संघटनेच्या (अस्मी) प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन केल्याने रुग्ण सेवेवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.त्यात आता परिचारिकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला.त्यामुळे ससूनची आरोग्य सेवा कोलमडणार असल्याचे बोलले जात आहे.नर्सिंग फेडरेशनच्या अनुराधा आठवले म्हणाल्या,आरोग्य विभागात या पध्दतीने प्रथमच बदल्या करण्यात आल्या आहेत.प्रशासनाने केवळ आकसापोटी या बदल्या केल्या असून त्याचा निषेध करण्यासाठी केवळ ससून रुग्णालयातील परिचारिका संपावर जाणार आहेत.रुग्णालयातील तीनही शिफ्टमधील सुमारे ५०० पारिचारिका संपात सहभागी होतील.ससून रुग्णालय प्रशासनाच्या वरिष्ठ समितीची परिचारिका संघटनेच्या परिचारिकांबरोबर चर्चा झाली आहे.त्यामुळे संघटनेकडून सोमवारी सकाळी संपाबाबतची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.कदाचित संप पुढे ढकलला जाऊ शकतो असा अंदाज बी.जे.मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाताडॉ.अजय चंदनवाले यांनी व्यक्त केला.