पुणे: ससून रुग्णालयाला शासनाकडून २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी १२ काेटी २५ लाख निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ३ काेटी ६७ लाख ५० हजार इतकी रक्कम अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (बीडीएस) वर प्राप्त झाली. त्यापैकी, ४९ लाख ५५ हजार रुपयांची औषध खरेदी संस्था स्तरावर करण्यात आली. त्याव्यतिरिक्त संस्था स्तरावर २ काेटी ६२ लाख ६० हजार रुपयांची औषधे संस्था स्तरावर खरेदी करण्यात आली असल्याचा अहवाल ससूनने विभागीय आयुक्तांना शनिवारी सादर केला.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त साैरभ राव आणि जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी ससून रुग्णालयाची शुक्रवारी पाहणी केली. तसेच औषध पुरवठा, मनुष्यबळ आणि खाटांची संख्या याचा आढावा घेतला. ससूनमध्ये किती औषधांची खरेदी केली? याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुसार ससून रुग्णालयाने शनिवारी सायंकाळी सादर केला. दरम्यान, याबाबत ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
ससून रुग्णालयात सकाळपासूनच अहवाल तयार करण्याची लगबग सुरू हाेती. सुटीचा दिवस असतानाही डाॅ. संजीव ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. किरण कुमार जाधव, कैद्यांच्या समितीचे प्रमुख व उपअधीक्षक डाॅ. सुजीत दिव्हारे हेदेखील उपस्थित हाेते.
''ससून रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाला आहे. हा अहवाल शनिवारीच शासनालाही पाठवण्यात आला आहे. - साैरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे''
हाफकिनकडून मिळाली नाही औषधे
ससूनकडून गेल्या वित्तीय वर्षात २०२२-२३ ला औषधांसाठी सहा कोटी २७ हजार रुपये हाफकिन संस्थेला वर्ग करण्यात आले. मात्र, ससूनकडून हाफकिन संस्थेला औषधे खरेदीसाठी देण्यात आलेल्या रकमेपैकी कोणतीही औषधे या आर्थिक वर्षात प्राप्त झालेली नाहीत, अशीही धक्कादायक माहिती अहवालातून समाेर आली आहे.
कैद्यांची माहिती देणे टाळले
ससून हाॅस्पिटलने विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या अहवालात कैद्यांची माहिती देणे ससून हाॅस्पिटलने साेयिस्कररीत्या टाळले आहे. कैद्यांबाबत विभागीय आयुक्तांनी माहिती मागवली असताना ससूनने ती देणे टाळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.