पुणे : विविध मागण्यांसाठी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना (मार्ड) चे डॉक्टर साेमवारपासून (दि. २) संपावर जाणार आहेत. यामध्ये ससून रुग्णालयातील सहाशे निवासी डॉक्टर सहभागी होणार आहेत. त्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील पाच हजारांहून अधिक डॉक्टर संपात सहभागी होणार आहेत. अतिदक्षता विभागवगळता इतर सर्व बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. तसेच पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपात सहभागी होणार आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयांत १,४३२ जागांची पदनिर्मिती करण्यात यावी, वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील वसतिगृहांची दुरवस्था नीट करावी तसेच निवासी, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची हेळसांड थांबवावी, सहयोगी आणि सहायक प्राध्यापकांची अपुरे पदे तातडीने भरावीत या मागण्या संघटनेने केल्या आहेत.
याबाबत पुण्यातील मार्ड संघटनेचे सचिव डॉ. किरण घुगे म्हणाले की, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करावे. अनेक ठिकाणी निवासी डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांवर कामाचा ताण येत आहे. सरकारला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र, त्याकडे शासनाने लक्ष दिले नाही.