मृत्यूदर रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली. ससून रुग्णालयासाठी तांत्रिक सल्लागार समिती नेमण्यात आली. पुढील वर्षभर रुग्णांची संख्या वाढत असताना पायाभूत सुविधा निर्माण करण्यापासून अनेक आव्हाने रुग्णालय प्रशासनासमोर उभी होती. प्रत्येक आव्हानांचा सामना करत ससून रुग्णालयात उपचारांवर भर देण्यात आला. ससून रुग्णालयाच्या आवारातील ११ मजली इमारतीला कोव्हिड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला.
ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले, ‘कोरोनाचा सामना करणे हे खूप मोठे आव्हान होते. सर्वत्र भीतीचे वातावरण होते. कोरोनाग्रस्त रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल करुन घेतले जात नव्हते. अशा वेळी ससून रुग्णालयात उपचारांची व्यवस्था करण्यात आली. कोरोना चाचणी केंद्र सुरु करण्यात आले. पीपीई किट, ग्लोव्ह्ज यांचा पुरवठा करण्यात आला. मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले. कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना नॉन-कोव्हिड रुग्णांवरही उपचार सुरु ठेवायचे होते. २८ बेड ते ८२५ बेड हा प्रवास रुग्णालयाने पार केला. १२८ खाटांचा सर्वात मोठा अतिदक्षता विभाग सज्ज करण्यात आला.’