पुणे : ससून रुग्णालयात हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकाकडून पैसे मागितल्याच्या प्रकरणाची दखल महात्मा फुले जनआराेग्य याेजनेकडून घेण्यात आली आहे. ससून रुग्णालयात जाऊन हृदयशल्यचिकित्सा म्हणजेच सीव्हीटीएस विभागातील रुग्णांकडे चाैकशी केली असता येथील डाॅक्टरांनी आणखी चार ते पाच रुग्णांना पैसे मागितल्याचे स्पष्ट झाले.
खासगी रुग्णालयातील भरमसाठ उपचार परवडत नाहीत, असे रुग्ण ससूनमध्ये उपचारासाठी येतात. मात्र, त्या रुग्णांकडूनच पैसे उकळण्याचा गाेरखधंदा जाेमात असल्याचे ‘लाेकमत’ने उघडकीस आणले. हृदयाच्या ऑपरेशनसाठी विभागातील डाॅक्टर ५० हजार रुपये मागत असल्याचे संभाषणाचे रेकाॅर्डिंगदेखील आहे. याप्रकरणी संबंधितांची ससूनकडून चाैकशी करण्यात येत आहे.
पैसे भरा, नाहीतर डिस्चार्ज घ्या!
येथील जवळपास सर्वच शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआराेग्य याेजनेंतर्गत (एमजेपीजेएवाय) माेफत केल्या जातात. तरीदेखील ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत मागणी केली जाते. यात ३५ हजारही भरू न शकलेल्या रुग्णाला तेथून डिस्चार्ज घ्यावा लागला हाेता. गरीब रुग्णांच्या टाळूवरचे लाेणी खाण्याचा हा प्रकार घडत आहे. पैसे न दिल्यास रुग्णांना घेऊन घरी जावे लागत असल्याचा दुर्दैवी प्रकारही येथे घडत आहे.
तक्रार करण्यासाठी पुढे येईनात रुग्ण
याप्रकरणी महात्मा फुले जनआराेग्य याेजनेचे पर्यवेक्षक दीपक कुलाळ यांनी ससून रुग्णालयातील ‘सीव्हीटीएस’ विभागात दाखल रुग्णांना भेट दिली. पैसे मागितले असल्याचे रुग्णांनी कुलाळ यांना सांगितले. त्यानंतर या रुग्णांना लेखी तक्रार करायला सांगण्यात आले आहे. पैसे घेतल्याची लेखी तक्रार रुग्ण करत नाहीत ताेपर्यंत काहीही कारवाई करता येत नाही, अशी भूमिका ‘एमजेपीजेएवाय’ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. रुग्ण तेथे उपचारासाठी दाखल असल्याने नातेवाईक घाबरून ससून किंवा एमजेपीजेएवाय याेजनेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करत नसल्याचेही दिसून आले.
रुग्णांची काेणतीही शस्त्रक्रिया किंवा उपचार एमजेपीजेएवाय याेजनेतून केल्यास व त्यांच्याकडून पैसे आकारले गेल्यास त्याची लेखी तक्रार त्यांनी रुग्णालयातील आराेग्यमित्राकडे करावी. तसेच, १५५३८८ किंवा १८००२३३२२०० या टाेल फ्री क्रमांकावर तक्रार करावी.
- डाॅ. प्रीती लाेखंडे, समन्वयक, एमजेपीजेएवाय, पुणे