लष्कर : ससून रुग्णालयातील यंत्रणा पुन्हा काेलमडली. परिणामी येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना गैरसाेयींना सामाेरे जावे लागत आहे. येथे दररोज दीड हजारच्या वर गरीब रुग्ण विविध रोगांवर उपचार घेण्यासाठी येतात. चंदननगर येथून सकाळी १० वाजता उपचारासाठी आलेली ज्येष्ठ महिलेची क्ष-किरण तपासणी करायला दुपारी २ वाजले. त्यानंतर अहवाल घेण्यासाठी दोन दिवसांनी येण्यास सांगितले गेले.
पुणे कॅन्टोन्मेंटच्या पटेल रुग्णालयातून काेरोना संशयित स्त्री क्ष-किरण तपासणीसाठी आली असता, तिलाही तपासणी करण्यासाठी चार तासांचा अवधी लागला. त्यांनाही अहवालासाठी दुसऱ्यादिवशी या, असे सांगितले गेले. ससूनमधील ढासळलेल्या आरोग्य सुविधेबाबत दररोज अनेक तक्रारी येत आहेत. अतिरिक्त कर्मचारी तत्काळ भरूनही रुग्णांना आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नाही. त्वरित ऑनलाईन सुविधा सुरू करावी; अन्यथा आम्ही याबाबत ससून प्रशासनाविरोधात मोठे आंदोलन करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला.
याबाबत सुजित यादव (उपाध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेस अनु. जाती) म्हणाले की, ससूनमध्ये उपचारासाठी तेच लोक येतात, जे खासगी रुग्णालयात जाऊ शकत नाहीत. अशा गरिबांची कुचंबणा होणार असेल, तर आम्हाला मोठे आंदोलन करावे लागेल.
विजय जगताप (मास मूव्हमेंट संघटना) म्हणाले की, ससून रुग्णालय गरिबांसाठी संजीवनी आहे, कैद्यांना मिळणारी विशेष सवलत, सारख्या अनेक अंतर्गत परिस्थिती आहे. गरिबांचे हाल होणार असेल, तर प्रशासन आणि राज्य शासनाला जाब विचारावाच लागेल.
नरेश बोगा (रुग्णांचे नातेवाईक) म्हणाले की, माझ्या पत्नीला मी उपचारासाठी सकाळी घेऊन आलो, परंतु तपासणीतच खूप वेळ गेला. आता त्याचा अहवाल येण्यासाठी दोन दिवस थांबायला सांगितले आहे.