पुणे : कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या ससून रुग्णालयातील व सेवा अधिग्रहीत केलेल्या डाॅक्टर, नर्स व अन्य कर्मचा-यांसाठी आजही दररोज ६ लाख ५० हजार रुपयांचा खर्च होत आहे. सध्या यासाठी पंचतारांकित हाॅटेलसह २१ हाॅटेल मधील सुमारे ४४९ खोल्यांचे बुकींग असून, येथे सरासरी ५०० पेक्षा अधिक डाॅक्टर, नर्स व अन्य कर्मचारी यांची हाॅटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात येत असल्याचे पुणे शहर तहसिलदार तृप्ती कोलते यांनी सांगितले.
ससून रुग्णालयातील डाॅक्टर, नर्स व अन्य आरोग्य कर्मचारी दिवसरात्र काम करुन कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. सुरूवातीला काही दिवस हे डाॅक्टर, नर्स कोरोना वाॅर्डमध्ये ड्युटी करून पुन्हा आपल्या घरी जात होते. परंतु यामुळे डाॅक्टर, नर्सचे कुटंबातील व्यक्तींना देखील कोरोनाची लागण झाली. अखेर कोरोना ड्युटी करणा-या डाॅक्टर, नर्सची बाहेर रुग्णालया लगतच्या हाॅटेलमध्ये राहण्याची सोय करण्याची मागणी करण्यात आली.त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रामुख्याने ससून रुग्णालयात कोवीड १९ ड्युटी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुणे स्टेशन हद्दीत असलेल्या हाॅटेल मध्ये सोय करण्यात आली. सध्या दररोज किमान ४०० ते ५०० डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचारी यांची विविध हाॅटेलमध्ये राहण्याची सोय केली जाते. यासाठी हाॅटेलच्या दर्जानुसार दररोज २००० हजार ते ५०० रुपये असे खोलीचे भाडे घेतले जात असून, जेवणाचा खर्च वेगळाच होत आहे. ------३१ जुलै पर्यंत ५ कोटी ६४ लाखांचा खर्चशहरामध्ये प्रामुख्याने ससून रुग्णालयात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांवर उपाचार करणाऱ्या डाॅक्टर, नर्स आणि अन्य कर्मचारी यांची हाॅटेलमध्ये राहण्याची सोय केली जात आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे. सुरूवातीला काही हाॅटेलचे बील सीएसआर निधीतून देण्यात आली. परंतु आता निधीची कमतरता निर्माण झाली असून, ३१ जुलै अखेरपर्यंत हाॅटेल बील देण्यासाठी शासनाकडे ५ कोटी ६४ रुपयांची मागणी केली आहे.- डाॅ. जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिका------होस्टेल, विश्रामगृहे मात्र रिकामीच ससूनचे डाॅक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांना ड्युटीवर असताना व क्वरंटाईन काळात राहण्यासाठी पुणे स्टेशन परिसरातील नामांकित हाॅटेलमध्ये सोय करण्यात आली आहे. परंतु खर्च अधिक होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आयबी बंगला, सर्किट हाऊस येथे आणि औध रुग्णालयातील कर्मचा -यांसाठी पुणे विद्यापीठ आणि पाषाण येथील एनसीएलचे हाॅस्टेल मध्ये सोय करण्यात आली आहे. परंतु येथील बहुतेक खोल्या रिकाम्या असून, एनसीएल हाॅस्टेलमध्ये सर्व सोय करूनही डाॅक्टर, नर्स जाण्यास तयार नाहीत. ------ ससूनकडे ७४ कोटींचा निधी पडून - डाॅक्टर, नर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचा खर्च ससूनलाच करावा लागणार सध्या ससून रुग्णालयाकडे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील अनुदानाचे २७ कोटी १९ लाख रुपयांचा व अन्य असा तब्बल ७४ कोटी रुपयांचा निधी पडून आहे. त्यानुसार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जमा झालेला निधीमधुन डॉक्टर, नर्स व हॉस्पीटल कर्मचारी यांचे निवासाकरिता माहे एप्रिल २०२० ते आजअखेरपर्यंतच्या कालावधीमध्ये अधिग्रहीत केलेल्या हॉटेलची व भोजनाची देयक अदा करण्याबाबत आपले स्तरावरुन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व यापुढील कालावधीमधील हॉटेलची व भोजनाची प्राप्त होणारी देयके अदा करणेबाबत आपले स्तरावरुन तरतुद करण्यात यावी, असे स्पष्ट आदेश प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.