पुणे : ससून रुग्णालयातील काही डाॅक्टर खासगी मेडिकलवाल्यांसाेबत मिळून गाेरगरीब रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांची शस्त्रक्रिया याेजनेतून माेफत झालेली असताना रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी मेडिकलमधून औषधे, शस्त्रक्रियेचे साहित्य खरेदी करण्यास सांगत न्युराेसर्जरी विभागातील एका निवासी डाॅक्टरने तब्बल २४ हजार ५०० रुपयांची मागणी केल्याचा व्हिडीओ समाेर आला आहे. इतकेच नव्हे तर पैसे न दिल्यास पेशंट दगावण्याची भीती घालतानाच नातेवाइकांना पाेलिस केसमध्ये अडकवण्याची धमकीही या डाॅक्टरने दिली आहे.
काेंढव्यातील सय्यदनगर भागात एक विधवा महिला असून, तिच्या १७ वर्षीय मुलावर ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी मेंदूची शस्त्रक्रिया झाली. त्याचा डिस्चार्ज करतेवेळी मात्र न्युराेसर्जरी विभागातील निवासी डाॅ. किरण याने त्यांना २४ हजार ५०० रुपयांचे किट मेडिकल तेजपाल मेडिकलमधून आणण्यास सांगितले. तसेच तेजपाल मेडिकलमध्ये ते पैसे भरण्यास सांगितले. यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांनी काेंढव्यातील जुबेर मेमन या सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांच्या लाेकांनी हे स्टिंग ऑपरेशन करून हा प्रकार उघडकीस आणला. या स्टिंगमध्ये संबंधित डाॅक्टर हा रुग्णाच्या नातेवाइकांना पैसे मागताना दिसत आहे. यामुळे गरीब रुग्णांना लुटणाऱ्या डॉक्टरांची साखळीच असल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर आता ससूनचे अधिष्ठाता नेमकी काय कारवाई करतात? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
काय म्हटले व्हिडीओत?
या व्हिडीओमध्ये नातेवाइकांना डाॅ. किरण या मुलाची शस्त्रक्रिया करण्यासाठी एक किट लागली आहे, असे सांगत त्या किटचे २४ हजार ५०० रुपये स्टेशन परिसरात असलेल्या मेडिकलमध्ये भरायला सांगताे. त्यावर नातेवाईक त्यांच्याकडे ८ हजार रुपये असल्याचे सांगतात. मात्र, हा डाॅक्टर काहीही न ऐकता त्यांना भीती घालताे की, काल एका नातेवाइकाने हे किट दिले नाही, त्यामुळे त्यांचा पेशंटचा मृत्यू झाला. इतकेच नव्हे तर तुम्ही जर पैसे दिले नाही तर तुमच्या सर्व नातेवाइकांवर एमएलसी केस टाकून पाेलिस केस करण्यात येईल, अशी धमकी हा डाॅक्टर देताना दिसत आहे. यामुळे पैशांची मागणी करणाऱ्या डॉक्टरांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
नातेवाईकांकडून मेडिकलच्या नावे लूट
ही केवळ पहिलीच केस नसून याआधी देखील येथील खासगी मेडिकल चालक डाॅक्टरांना हाताशी धरून पैसे कमवत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा गैरप्रकार गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुरू आहे. ताे आता या स्टिंग ऑपरेशनच्या निमित्ताने उघडकीस आला आहे. त्यामुळे ससून रुग्णालयातील ही खाबुगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
सय्यदनगरमध्ये १७ वर्षाच्या मुलाच्या नातेवाईकाची ससूनच्या न्यूराेसर्जरी विभागात याेजनेतून माेफत शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना बाहेरून १५ हजारांचे मेडिसीन आणले. आता साडेचाेवीस हजारांची मागणी डाॅ. किरण याने केली. आम्ही त्याचे स्टिंग ऑपरेशन केले असता त्यामध्ये सर्व काही ताे बाेलल्याचे रेकाॅर्ड झाले आहे. जर पैसे दिले नाहीत तर सगळ्यांवर पाेलीस केस दाखल करू, अशीही दमदाटी त्याने केली आहे. याची ससूनचे अधिष्ठाता आणि पाेलिसांकडे तक्रार दिली आहे.
- जुबेर मेमन, महाराष्ट्र मुस्लिम काॅन्फरन्स
या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यासाठी डॉ. मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून तातडीने कारवाई केली.
-डॉ. चंद्रकांत म्हस्के, प्रभारी अधिष्ठाता, ससून रुग्णालय