सासवड : सासवडमधील दहीहंडी उत्सव यंदा पूर्णपणे डीजेविरहित साजरा करावा, असे आवाहन सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केले. नियम न पाळल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सासवड येथे सासवड पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक दहीहंडी उत्सव मंडळाच्या कार्यकर्र्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
गिरीगोसावी म्हणाले, ‘‘मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डीजेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कटाक्षाने पालन करावे. सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिल्याप्रमाणे आवाजाची पातळी ठेवावी. १८ वर्षांखालील गोविंदांना दहीहंडी फोडण्यासाठी प्रवेश देऊ नये. दहीहंडीचा कार्यक्रम हा विहित वेळेत पूर्ण करावा. महिलांची छेडछाड होणार नाही, याची दक्षता घ्यावी. वाहतुकीचे नियंत्रण करण्याच्या अनुषंगाने स्वयंसेवकांची नेमणूक करावी. डीजेचा वापर करता येणार नाही. कोणत्याही मंडळाने नियमांचे उल्लंघन केल्यास पदाधिकारी व डीजे चालक-मालकांवर खटले दाखल करण्यात येतील, असेही गिरीगोसावी यांनी सांगितले. बैठकीला सासवडमधील कान्हा, संघर्ष, हनुमान, कन्हैया, शिवशंभो, भाजपा दहीहंडी, स्व. चंदूकाका जगताप, सासवडकर दहीहंडी मंडळ आदी मंडळांचे पदाधिकारी, गोपनीय विभागाचे भगीरथ घुले, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, नगरसेवक अजित जगताप, संजय ग. जगताप, संदीप जगताप, केरू शितोळे, तुषार जगताप, राजन जगताप आदी या वेळी उपस्थित होते.