सासवड : पुणे येथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दि.१४ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवडला दोन दिवसांच्या मुक्कामासाठी येत आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सासवड नगरपालिकेच्या वतीने पालखीतळावरील भिंतींवर रंगरंगोटी करण्यात आली असून, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवडमध्ये दि.१४ रोजी येणार असून, दि.१५ रोजी मुक्काम करून दि.१६ रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. यानिमित्त सोहळ्याच्या काळात सासवड नगर परिषदेच्या वतीने आरोग्य सेवा, पाणीपुरवठा व विद्युत सुविधा यांची सुविधा देण्यात येणार असून,
पालखी तळाची स्वच्छता करण्यात आली आहे. पालखी तळावर तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष, सीसी टीव्ही कॅमेरे, भाविकांना दर्शनासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांग, खांबावरील विजेचे दिवे व पालखी तंबूजवळ फ्लड लाइट, विद्युत रोषणाई आदी व्यवस्था जनरेटरसह करण्यात आली आहे. पालखी तळ व परिसरात १० ठिकाणी तात्पुरती १० नळ कोंडाळी, पाणी टँकर भरून देण्याची व्यवस्था, पाणीपुरवठा केंद्र, हिवरे रोड, वीर रोड, वढणेवस्ती व बोरावकेमळा येथे केली जाते. टँकरमध्ये व सासवडच्या आसपास असलेल्या विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्याची व्यवस्था ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने केली जाते. पालखी मुक्कामाच्या काळात संपूर्ण शहरात सकाळी व संध्याकाळी ज्यादा पाणीपुरवठा करण्याची सोय करण्यात आली आहे.
तात्पुरत्या स्वरूपात स्नानगृहांची उभारणी
पालखी तळावर महिला व पुरुषांसाठी एकूण ३२ सीटस शौचालये व १६ सीटस स्नानगृहे बांधण्यात आली असून, ती अपुरी पडत असल्याने पालखी तळाशेजारील जागेत तात्पुरत्या स्वरूपात फायबरचे महिला व पुरुषांसाठी १५० सीटस् शौचालयांची उभारणी केली जाते. तात्पुरत्या स्वरूपात स्नानगृहांची उभारणी केली जाते. त्यासाठी पाण्याचे कनेक्शन घेण्यात येते, तसेच निर्मलवारी पालखी सोहळा यांच्यामार्फत सालाबादप्रमाणे १५०० सीटस फायबरच्या शौचालयांची सदर काळात मागणी करण्यात आली असून, सदर शौचालयांची जागा निश्चित करून ठिकठिकाणी १००-१०० युनिट बसविण्यात येणार आहेत. -निखिल मोरे, मुख्याधिकारी, सासवड नगर परिषद
कचरा वाहतूक व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार
पालखी काळात जादा कामगार वापरून सासवड शहरातील गटारे, कचराकुंड्यांभोवती, गल्लीबोळांमध्ये, पालखीतळाचा संपूर्ण परिसर, संत सोपानकाका मंदिराचा संपूर्ण परिसर, शहरातील मेन रस्त्याच्या कडेने साफसफाई करून जंतुनाशक पावडर व औषधाची फवारणी केली जाते. पालखी काळात नागरी सुविधा चांगल्या प्रकारे देण्यासाठी सर्व ठिकाणी कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली असून, शहरामध्ये कचरा साठू नये, जेवल्यानंतर पत्रावळ्या साठू नयेत, त्यासाठी कचरा वाहतूक व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. संपूर्ण शहरात पालखी येण्यापूर्वी व गेल्यानंतर फॉगिंग मशीनने धुरळणी व जंतुनाशक पावडरची फवारणी केली जाणार आहे. -मोहन चव्हाण, आरोग्य अधिकारी...
''पालखीच्या वास्तव्याकरिता परंपरेनुसार अंकलीच्या शितोळे सरकारांचा तंबू उभारून सज्ज झाला आहे. आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील तंबूत असणारा हा पहिला मुक्काम असून, पालखी सोहळ्याचे राजाभाऊ चोपदार यांच्या मार्गदर्शनाखाली तंबू उभारणीचे काम होते. कर्नाटक- बेळगाव येथील अंकलीच्या ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या घराण्यात सुमारे २०० वर्षांपासून पालखीच्या तंबूचा त्याचप्रमाणे माउलींच्या अश्वाचा मान असून, ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याकडून हा मान त्यांच्याकडे आल्याचे निखळ यांनी सांगितले. तळावर उभारण्यात आलेल्या अष्टकोनी आकाराच्या तंबूची लांबी २८ फूट, रुंदी १८ फूट, तर उंची १४ फूट असून, तो पूर्णतः पाणी व अग्निविरोधक आहे. तंबूमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. माउलींचा हा तंबू उभारणीसाठी कोणत्याही स्वरूपाचे नट-बोल्ट वापरले नसून, हा तंबू केवळ अर्ध्या तासात उभारता, त्याचप्रमाणे काढताही येतो, असे निखळ यांनी सांगितले.''