सासवड : वीर धरणातून नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन २६ मेपर्यंत चालू राहिल्याने वीर धरणातील पाणीपातळी मृत साठ्याच्याही खाली गेल्याने सासवड शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमध्ये पाणी येणे पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे अतिशय आतील बाजूला असलेल्या जुन्या धरणामध्ये तात्पुरते दोन वीजपंंप लावून जॅकवेलमध्ये पाणी घेण्याची सासवड नगरपालिकेची कसरत सुरू असून, त्यातून सासवड शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. सासवड शहरातील ६० हजार नागरिकांना रोज सुमारे ६० लाख लिटर पाणी लागते. शहराला पाणीपुरवठा करणारे सिद्धेश्वर, गराडे, घोरवडी धरणांतील पाण्याचा स्रोत आटल्याने आता पिण्याच्या पाण्यासाठी वीर योजनेचा स्रोत आहे. त्यातून पदाधिकारी यांनी पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकारी यांना भेटून याबाबत निवेदन दिले होते. तरीही आचारसंहितेचे कारण देऊन सदर प्रश्न प्रलंबित ठेवल्याने व जलसंपदा (नियोजन) विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने सासवड शहरातील नागरिकांचे अडचणीत वाढ झाली. जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे या खात्याचे मंत्री असून याबाबतचे नियोजन त्यांच्या खात्याकडे आहे. वास्तविक निरा डावा कालव्यास आवर्तन १५ दिवस जादा सोडल्याने धरणातील पाणी पातळी वेगाने कमी होत गेली. यावर सासवड नगरपरिषदेने मा. जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा केल्याने दि २६ मे रोजी नीरा डावा कालव्याचे ऊन्हाळी आवर्तन बंद केले. त्यानंतर दोन दिवसात शहराचा पाणीपुरवठा पाणी पातळी खाली गेल्याने विस्कळीत झाला यावर सोशल मीडिया व नागरिकांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्याने राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुंजवणी धरणातून अर्धा टीएमसी पाणी वीर धरणात सोडण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, हे पाणी वीर धरणात किती क्षमतेने पोहोचेल व किती टीएमसी पाणी धरणात येईल याविषयी शंकाच आहे..............................४राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशानुसार वीर धरणाचा डावा कालवा बंद करण्याबाबत व अर्धा टीएमसी गुंजवणी धरणातील पाणी २३० क्युसेक्स वेगाने वीर धरणात सोडण्याचे आदेश दिले खरे; परंतु गुंजवणी धरणातून सोडलेले पाणी प्रत्यक्ष वीर धरणात किती पोहोचणार? तसेच हे पाणी सासवड शहरासाठी राखीव आहे का ? कारण वीर धरणावरून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यन्वित आहेत. त्यामुळे हे पाणी पूर्ण क्षमतेने सासवडला मिळेल का? याविषयी गंभीर साशंकता सासवडच्या नागरिकांमध्ये आहे.
................
* सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे व उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती संजय ग. जगताप तसेच सासवडचे नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पाटबंधारे विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील ही कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी सांगितले. तसेच पाणी जपून वापरण्याचे आवाहन देखील त्यांनी या वेळी केले..........