सासवड : आगामी सासवड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एकला चलो ची भूमिका घेतली आहे. सासवड नगर परिषदेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. याबाबतही वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार अधिकृत घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे सासवड शहराध्यक्ष राहुल गिरमे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सासवड शहर प्रवक्तेपदी महेश जगताप यांची निवड करण्यात आली असून यापुढील पक्षाची अधिकृत भूमिका महेश जगताप जाहीर करतील असेही जाहीर करण्यात आले आहे.
सासवड ( ता. पुरंदर ) येथील पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष राहुल गिरमे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ता नाना जगताप, कलाताई फडतरे, ज्येष्ठ नगरसेविका मंगल म्हेत्रे, महिलाध्यक्षा नीता सुभागडे, प्रवक्ते महेश जगताप, कुमुदिनी पांढरे, दत्तात्रय जगताप, महेंद्र घोडके, विनोद जगताप, मनोहर जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही सासवड येथे भेट देऊन पक्षाच्या कामाचा आढावा घेऊन स्वतःच्या ताकदीवर लढण्याची हिंमत येथे व्यक्त झाली, याचे समाधान वाटते; मात्र एकजूट दाखविली आणि एकदिलाने लढलो तर सासवड पालिकेत आपली सत्ता येऊ शकते. त्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या सूचना दिल्याचे राहुल गिरमे यांनी सांगितले आहे.
पक्षाचे प्रवक्ते महेश जगताप यांनी सांगितले की, सासवडसह इतर निवडणुकाही राष्ट्रवादी स्वबळावर लढविण्याच्या तयारीत आहे. याबाबत पक्षाने तसे आदेश दिले असून त्यादृष्टीने पक्षातील सर्वच नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. उमेदवारांची चाचपणी करून त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. सध्या आमच्याकडे उमेदवारांची यादी संपूर्ण तयार असून आम्ही सासवडमधील जनतेकडे विविध मुद्दे घेऊन जात आहोत. पारदर्शक आणि गतिमान कारभार करण्यासाठी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे महेश जगताप यांनी सांगितले आहे.
सासवड हा काँग्रेस पक्षाचा विशेषतः आमदार संजय जगताप यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथील नगरपालिका कायम जगताप कुटुंबीयांच्या ताब्यात राहिली आहे. त्या जगतापांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केल्याने सासवड नगरपालिका निवडणुकीची रंगत वाढणार आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी खरोखरच स्वबळावर लढवणार की आमदार जगताप यांच्याशी आघाडी करून लढणार, याकडे आता कार्यकर्त्यांसह पुरंदर तालुक्याचे लक्ष असणार आहे.