लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : सासवड (ता. पुरंदर) येथे पोलिसांनी रात्री अचानक छापा टाकून दारूविक्री करणाऱ्या सात जणांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केली. या सर्वांना सासवड येथील कोर्टात हजर केले. मात्र या सर्वांच्या घरातील कोणीही जामीन देण्यासाठी पुढे न आल्याने शेवटी सर्वांची रवानगी पुणे येथील येरवडा कारागृहात करण्यात आली. याबाबत पोलीस नाईक कुंडलिक माने यांनी फिर्याद दाखल केली आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पहिल्या कारवाईमध्ये सोनबा अनंता गायकवाड (वय २७, रा. हिवरे), पप्पू लियाकम अन्सारी (वय ४०) आणि तुळशीराम किसन कांबळे, (वय ३८, दोघेही रा. सासवड) अशा तिघांना अटक करून त्यांच्याकडून २० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेमध्ये उत्तम शिवाजी सुतार (वय ४०), विराज प्रभू वाल्मीकी (वय २७), सुनील अरुण भोंडे (वय ३२) आणि तुषार किसन कांबळे (वय ३३, सर्वजण रा. सासवड, ता. पुरंदर) अशी या चौघांची नावे असून, त्यांच्याकडून २५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की, सासवड हद्दीमध्ये स्मशानभूमीलगत एका वीटभट्टीवर गावठी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक नारायण गीते, अण्णासाहेब टापरे, राजेश माळेगावे तसेच पोलीस नाईक कुंडलिक माने, पी. बी. चव्हाण, राहुल कोल्हे, महेश खरात, ज्योतिबा भोसले, चालक पोलीस हवालदार बी. एन. लडकत, काशिनाथ जाधव, पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे, गोडसे, अशोक खुटवड यांच्यासह पोलीस मित्र यांनी या ठिकाणी साध्या वेशात जाऊन दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकला. त्या वेळी हे सर्व आरोपी त्यांच्या ओळखीच्या लोकांना गावठी हातभट्टीची दारू विकत होते. या सर्वांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केली. कुटुंबीयांनी दिला जामीन देण्यास नकार दरम्यान, पोलिसांनी या सर्वांना रात्री अटक करून न्यायालयात हजर केले असताना जामीन येथील कोर्टातच मिळाला असता; मात्र या सर्वांपैकी कोणाच्याच घरातील व्यक्ती कोर्ट अथवा सासवड पोलीस ठाण्यात फिरकलीच नाही. याबाबत त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की, आम्ही यांच्या रोजच्या कटकटीला पूर्णपणे वैतागलो आहे. त्यामुळे आम्ही जामीन देण्यास नकार दिला.
सासवडमध्ये दारूविक्रीवर छापा
By admin | Published: May 31, 2017 1:32 AM