सासवड (पुणे) : सासवड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे गराडे आणि घोरवडी ही दोन धरणे पूर्णपणे आटली आहेत. सध्या वीर धरणावरून पाणीपुरवठा केला जात असून पावसाने अद्यापही ओढ दिल्याने पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर नागरिकांवर मोठ्या संकटाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. उपलब्ध पाणीसाठा पाऊस होईपर्यंत पुरण्यासाठी यापुढे दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सासवड नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे.
गराडे, घोरवडी, सिद्धेश्वर जलाशयातील उपलब्ध पाणी स्थानिक नागरिकांना पिण्यासाठी आवश्यक असल्याने तेथील पाणी उपसा बंद करण्याच्या पाटबंधारे विभागाने लेखी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता केवळ वीर धरणाच्या पाण्यावर सासवडचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यातच पावसाने दडी मारल्याने सासवड शहराचा नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा एक दिवसाआड होता. दि.१९ पासून दोन दिवसाआड केल्याचे सासवड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दवंडीद्वारे जाहीर केले. लांबलेल्या पावसाने पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या सासवड शहरास ऐन पावसाळ्यात टंचाईच्या झळा बसतानाच विस्कळित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागण्याचे संकट आले आहे.
सासवड शहरास एकमेव वीर धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या वीर धरणात सासवडला पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे; परंतु पावसाळा असूनही पाऊसच पडत नसल्याने पाणीसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. तसेच, पाऊस सुरू झाला तरी पाणीसाठा होण्यास काही दिवस लागतील आणि पाऊसच झाला नाही तर पाणी टंचाईचे संकट आणखी वाढण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाणी पुढील साठा होईपर्यंत नागरिकांना पिण्यासाठी मिळाले पाहिजे यासाठी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संकेत नंदवंशी यांनी दिली आहे.
सासवडला पाणीपुरवठा करणारे गराडे धरण दोन महिन्यांपूर्वीच कोरडे पडल्याने तेव्हापासून पाणी उपसा बंद केला आहे. तसेच घोरवडी धरणात पाणी उपलब्ध असेपर्यंत त्यातील उपसा सुरूच होता; परंतु सध्या घोरवडी धरण पूर्णपणे आटले आहे. वीर धरणात ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच पावसाने ताण दिल्याने दोन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सद्यःस्थितीत सर्व यंत्रणा सुरळीत चालू आहे. वादळी वारे येणे किंवा तांत्रिक बिघाड अथवा विद्युत बिघाड झाला तरच व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने नागरिकांनी पाणी वाया न घालविता जपून वापर करावा.
- निखिल मोरे, मुख्याधिकारी, नगरपालिका, सासवड.