सासवड : सासवड नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा नीलिमा भारत चौखंडे यांच्या नारायणपूर रस्त्यावरील बंगल्यात बुधवारी ( दि. १८ ) मध्यरात्री दोनच्या सुमारास दरोडा पडला. पाच दरोडेखोरांनी कटावणीने दरवाजा तोडून घरात घुसून तलवारीच्या धाकाने सुमारे ४० तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख १ लाख २८ हजार रुपये लंपास केले. भर रस्त्यावर असलेल्या ठिकाणी इतका मोठा दरोडा पडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. याबाबत चौखंडे यांनी सासवड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.याबाबतची हकीकत अशी, चौखंडे यांच्या बंगल्यात मध्यरात्री पाच दरोडेखोरांनी मागचे दार कटावणीने तोडून प्रवेश केला. तळमजल्यावरील खोलीत भारत चौखंडे यांचे वडील बाळासाहेब चौखंडे व आई शकुंतला चौखंडे झोपले होते. दरवाजाचा आवाज आल्याने शकुंतला यांना जाग आली. त्या वेळी एका चोरट्याने त्यांच्या गळ्यावर तलवार लावून दागिन्यांची मागणी केली.त्या वेळी बाळासाहेब चौखंडे जागे झाले. त्यांनाही दुसऱ्या चोरट्याने तलवारीचा धाक दाखवून पैशांची व दागिन्यांची मागणी केली. त्या वेळी शकुंतला यांनी आपल्या कडील सोन्याचे दागिने काढून दिले. त्यानंतर एक दरोडेखोर तिथेच थांबला व इतर दोघे वरील मजल्यावर गेले. तिथे भारत चौखंडे, नीलिमा चौखंडे व त्यांची पाच वर्षांची मुलगी होती. त्या वेळी चोरट्यांनी दार वाजवून दरवाजा उघडण्यास सांगितले. भारत यांनी दार उघडताच त्यांच्या व नीलिमा यांच्या गळ्याला तलवार लावून दागिने व पैशांची मागणी केली. जीवाच्या भीतीने चौखंडे दाम्पत्याने दागिने व पैसे काढून दिले.आज शिवजयंती असल्याने या रस्त्यावरून पुरंदर किल्ल्याकडे रात्रभर वाहतूक सुरू होती; परंतु या दरोड्याबाबत रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या कोणालाही समजले नाही. चोरी केल्यानंतर दरोडेखोर चालत कऱ्हा नदीकडे गेल्याचे चौखंडे यांनी सांगितले.याबाबत सासवड पोलीस स्टेशनमध्ये कलम ४५७, ३८०, ३९२ नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक एस. आर. गौड यांच्या मार्गदशर्नाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळेगावे व हनीफ नदाफ यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके केली आहेत. दरोडेखोरांना लवकरात लवकर पकडण्यात येईल, अशी गौड यांनी आमच्या प्रतिनिधीकडे खात्री दिली. (वार्ताहर)४या दाम्पत्याकडून ४० तोळे सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी पळविले. त्यामध्ये अंगठी, गंठण, ब्रेसलेट, बांगड्या, सोन्याची साखळी, राणीहार, चांदीचे पैंजण तसेच दोन किमती घड्याळे यांचा समावेश आहे.४याबाबत बोलताना बाळासाहेब चौखंडे यांनी सांगितले, की चोरटे तरुण असून, त्यांच्या तोंडावर रुमाल बांधले होते व मराठीतून आपसात बोलत होते. मध्यरात्री दोन ते चार असे दोन तास ते घरात होते. ४दरम्यान, याच परिसरातील अनिता बेलसरे यांच्या घराजवळ चोरटे थांबून चोरीच्या प्रयत्नात असताना, अनिता यांचे पती जयेश मोरेश्वर बेलसरे कामावरून घरी परतले होते. त्यांना घराबाहेर अडवून तलवारीच्या धाकाचा दम देऊन त्यांच्याकडील दोन हजार रुपये रोख व मोबाईल हिसकावून चोरटे पसार झाले.
सासवडला दरोडा; ४0 तोळे लुटले!
By admin | Published: February 19, 2015 11:30 PM