देहूगाव : अभिनेत्री केतकी चितळे यांनी समाज माध्यमात ''तुका म्हणे'' या शब्दाचा वापर करून वादग्रस्त विटंबनात्मक लेखन सोशल मीडियावर पोस्ट केले. देशातील कोणत्याही संताच्या नावाचा वापर करून कोणी वादग्रस्त व विटंबनात्मक लिखाण करत असेल तर त्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली श्री संत तुकाराम महाराज संस्थानने केली आहे.
याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन दिले आहे. यावेळी संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त अजित महाराज मोरे, दिलीप गोसावी, उमेश मोरे, आदी उपस्थित होते.यावेळी ते म्हणाले, श्री संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. ''तुका म्हणे'' ही संत तुकाराम महाराजांची ''नाममुद्रा'' असून, महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे. वारकरी संप्रदाय हा स्त्रियांचा सन्मानच करतो. मात्र, अशा प्रकारे राजकीय टीका टिप्पणी करण्यासाठी कोणत्याही संताचा अथवा त्यांच्या साहित्याचा आधार घेऊ नये. कोणीही संताचे विडंबन करू नये. माणसाने माणसासारखे वागावे, अशा टीका करणाऱ्यांनी वारकरी संप्रदायाचा अंत पाहू नये, असे आवाहन श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी देहू येथे केले.
श्री संत तुकाराम महाराजांनी वाईट प्रथा, चालीरीती, अंधश्रद्धा यांवर अभंगाच्या माध्यमातून अपप्रवृत्तीवर आघात केला आहे. मात्र, हे करताना त्यांनी प्रमाणही दिले आहेत. राजकीय टीका करण्याबाबत काही म्हणणे नाही, मात्र संतांच्या नावांचा आधार घेऊन अशी टीका करू नये. शासनाने अशा प्रवृत्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे व विश्वस्त अजित महाराज मोरे हे उपस्थित होते.