लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे :संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची तहान भागवणाऱ्या भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील सर्व धरणांमध्ये यंदा पुरेसा पाणी साठा शिल्लक आहे. मंगळवार (दि. १६) अखेरीस दोन्ही खोऱ्यात सरासरी ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठा शिल्लक असून तो गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त आहे.
दर वर्षी मार्च महिना संपत आला की जिल्ह्यात पाणी टंचाईची चर्चा सुरू होते. दौंड, बारामती, पुरंदर, शिरुर, इंदापूर या तालुक्यांमधील परंपरागत दुष्काळी वाड्या-वस्त्यांसठी टँकरची मागणी नोंदवली जाते. यंदा तशी स्थिती अद्याप नाही.
ऑक्टोबर महिन्यातल्या धुव्वाधार अवकाळी पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली होती. यामुळेच मार्च महिना संपत आला तरी धरणांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. सध्या धरणातील शिल्लक पाणीसाठा जपून वापरल्यास यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार नाही.
गेले काही वर्षात पावसाळ्यात धरणे शंभर टक्के भरली तरी पाण्याचे नियोजन नेटके करण्याची गरज भासली आहे. कारण पावसाळा उशीरा सुरु होत असल्याचे चित्र आहे. जूनऐवजी जुलै महिन्यात दमदार वृष्टी सुरु होत असल्याचे गेल्या दशकभरात अनेकदा दिसून आले आहे. परिणामी १५ जुलैपर्यंत पाणीसाठा टिकून राहिल असे नियोजन करणे गरजेचे झाले आहे. यंदाचा पाणीसाठा पंधरा जुलैपर्यंत पुरेसा ठरणारा असल्याचे जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगतात.
चौकट
कुकडी खोऱ्यात पाणी टंचाई?
पावसाळ्यात भीमा-कृष्णा खोऱ्यातील धरणे शंभर टक्के भरली असली तरी कुकडी खोऱ्यातील धरणसाठा पुरेसा नव्हता. त्यात इतर धरणांच्या तुलनेत गेल्या एका महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणी वापर झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. पाण्याचा वापर असाच सुरू राहिल्यास कुकडी खोऱ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते.
चौकट
धरणांतील पाणी साठ्याची माहिती
धरण क्षमता (टीएमसी) आजचा साठा टक्केवारी
टेमघर ३.७१ ०.५० १३.५३
वरसगाव १२.८२ ८.३९ ६५.४४
पानशेत १०.६५. ८.५५. ८०.२५
खडकवासला १.९७ ०.९० ४५.७२
पवना ८.५१ ४.८८ ५७.३३
मुळशी १८.४७ ६.६२ ३५.८८
चासकमान ७.५८ ४.७४ ६२.५२
भामा आसखेड ७.६७ ५.८९ ७३.८८
गुंजवणी ३.६९ २.०८ ५६.३४
भाटघर २३.५० १६.७३ ७१.१५
निरा देवघर ११.७३ ६.७६ ५७.६६
वीर ९.४१ ५.२० ५५.३३
माणिकडोह १०.१७ १.०२ १०.०४
येडगाव १.९४ ०.७६ ३९.३३
डिंभे १२.४९ ७.३० ६१.२०
उजनी ५३.५७ ३३.९९ ६०.३०
कोयना १००.१४ ६४.८७ ६४.७९
वारणा २७.५५ १६.८३ ६१.१४