लोकमत न्यूज नेटवर्क
परिंचे : यंदा नीरा नदीच्या खोऱ्यातील धरण साखळी क्षेत्रात पाणी साठा समाधान कारक आहे. वीर (ता. पुरंदर) धरणातून खरीप हंगामाबरोबर उन्हाळी हंगामात आवर्तन सलग सुरू ठेवण्यात आले असल्याने पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जून महिन्यापर्यंत हे आवर्तन सुरू ठेवण्यात येणार आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सहायक अभियंता विजय नलवडे यांनी सांगितले.
रविवारी (दि.१६) घेतलेल्या आकडेवारी नुसार वीर धरणात ५६ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा असल्याचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रीक यांनी सांगितले.
पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या वीर धरणांमध्ये ५.७ टिएमसी पाणी साठा म्हणजे ५६ टक्के पाणी साठा आहे. जुन्या कालव्यातून १ हजार ५५० क्युसेक व डाव्या कालव्यातून ८२७ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. भाटघर धरणात ५.५ टीएमसी म्हणजे २२.४४ टक्के पाणी साठा आहे. गुंजवणी धरणात १.७५ टीएमसी म्हणजे ४७.३४ टक्के पाणीसाठा आहे. नीरा देवघर धरणात २.६ टीएमसी म्हणजे २१ टक्के पाणीसाठा आहे. चालू वर्षी धरणात पाणीसाठा समाधानकारक राहिल्यामुळे सासवड व लोणंद शहरांना पिण्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत चालू राहिला होता.
पुणे व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या नीरा नदी खोऱ्यातील धरणांच्या पाण्याची परिस्थिती यंदा समाधानकारक असल्याचे पहायला मिळते. पाऊस जास्त झाल्यामुळे धरणातून सोडण्यात येणारे रब्बी हंगामाचे आवर्तन उशिरा सोडण्यात आले होते. चालू वर्षी धरणात पाणी साठा समाधान कारक राहिल्यामुळे सासवड व लोणंद शहरांना पिण्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत चालू रहाण्यासाठी मदत होणार आहे. नीरा-देवघर धरणातून ७२० क्युसेक, भाडघर धरणातून १९५६ क्युसेक व गुंजवणी धरणातून १०० क्युसेक पाणी वीर धरणात येत असून एकूण आवक २७७६ क्युसेक इतकी आहे. वीर धरणातून २३७७ क्युसेक जावक आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रीक यांनी सांगितले. यावेळी संभाजी शेडगे, विजय वाल्मिक आदी अधिकारी उपस्थित होते. फोटो ओळ- वीर (ता. पुरंदर) धरणात ५६ टक्के पाणीसाठा असून सलग उन्हाळी आवर्तन चालू ठेवण्यात आले आहे.