-डॉ. दिशा पारीख, पुणे
------------
१. संभोग कितीवेळा करावा? इतरांशी तुलना करावी का? संभोगाचे प्रमाण पुरेसे आणि सर्वसामान्य आहे का? -हे प्रश्न स्वाभाविक आहेत. याचे उत्तर सरसकट आकडेवारीत देता येत नाही. दोघांच्या नातेसंबंधाची स्थिती, दर्जा, भावनिक गुंतागुंत, शारीरिक-मानसिक आरोग्याचा दर्जा, व्यक्तीची जीवनशैली, कामाचे स्वरूप, दैनंदिन जीवन अशा अनेक घटकांवर संभोगाचे प्रमाण अवलंबून असते. मधुचंद्राच्या कालावधीत जोडप्यांचे संभोगाचे प्रमाण नातेसंबंध जसे खुलत जातात तसे वाढत जाते. मुलांना जन्म दिल्या नंतर, मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारताना लैंगिक संभोगाचे प्रमाण कमी होऊ शकते. पण कितीवेळा या संख्येपेक्षाही आनंद आणि समाधान महत्त्वाचे असते. अनेक संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, ज्या व्यक्तींचे लैंगिक संभोगाचे प्रमाण जास्त आहे त्या व्यक्तींचे लैंगिक आयुष्य आनंदी आणि समाधानी असतेच असे नाही.
प्रत्येक व्यक्तीची लैंगिक ऊर्मी आणि इच्छा निरनिराळी असते. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे आणि म्हणूनच लैंगिक संबंध असणाऱ्या जोडप्यांमध्ये दोघांना पुरेसे आणि समाधानकारक ठरेल असे प्रमाण त्या दोघांनी मिळून ठरवलेले असावे. एकमेकांशी जुळवून घेण्यावर मयार्दा येत असतील, अडचणी जाणवत असतील, नात्यात सुसंवाद नसेल तर त्याचा विपरीत परिणाम लैंगिक संबंधावर होतो. त्यामुळे लैंगिक संभोगाचे प्रमाण महत्त्वाचे नसून आनंद, समाधान आणि सुसंवाद महत्वाचा आहे. यासाठी लैंगिक तज्ज्ञांची मदत आणि मार्गदर्शन घेता येईल.
२. हस्तमैथून करणे योग्य आहे का?
-हस्तमैथूनात व्यक्ती स्वत:च स्वत:ला उत्तेजना देऊन लैंगिक समाधान मिळवत असते. त्यामुळे हस्तमैथून संपूर्णपणे सुरक्षित आणि नॉर्मल आहे. असे असले तरी हस्तमैथुनासंबंधी अनेक गैरसमज आढळतात. हस्तमैथुनामुळे व्यक्तीचा काही प्रमाणात ताण कमी होऊन रिलॅक्स वाटते. हस्तमैथून कितीदा करावे याचे निश्चित प्रमाण नाही. परंतु व्यक्तीच्या मनात फक्त हस्तमैथुनाचेच विचार घोळत असतील आणि वारंवार तीच कृती केली जात असेल आणि त्यामुळे दैनंदिन दिनक्रमात अडचणी उद्भवत असतील तर यासाठी लैंगिक तज्ञचा सल्ला आवश्यक आहे.
३. संभोगाचा कालावधी किती असावा?
-संभोगाच्या कालावधीवर आदर्श उत्तर नाही. जोडप्याचे आरोग्य, इच्छा, वेळ, वातावरण, खाजगीपणा, नात्याचा दर्जा यावर हा कालावधी अवलंबून असतो. काही जोडप्यांना कमी कालावधीत केलेल्या संभोगात रूची असते. काहींना दीर्घ वेळासाठी संभोग हवा असतो. व्यस्त दिनक्रमात कमी कालावधीच्या संभोगाला प्राधान्य दिले जाते. सुट्टीचा दिवशी निवांतपणे संभोग करण्याकडे कल दिसून येतो. प्रत्यक्ष संभोगाचा वेळ आणि संभोगपूर्व क्रिडेला अधिक वेळ दिल्याने समाधानाचा दर्जा वाढतो.
वेळेपुर्वीच आणि इच्छेशिवाय वीर्यपतन झाले तर व्यक्तीचे स्वत:चे आणि जोडीदाराचे समाधान होत नाही. काहींना वीर्यपतनासाठी बराच वेळ आणि कष्ट घ्यावे लागतात त्यामुळे आनंदाच्या अतिउच्च दर्जापर्यंत पोहोचण्यात अडथळे येतात. शेवटी व्यक्ती असमाधानी राहते. अशा परिसथितीत लैंगिक तज्ज्ञाचे मार्गदर्शन लाभदायक ठरते.
४. लैंगिक संभोगानंतर लगेच लिंगाची ताठरता येण्यासाठी असमर्थता असेल तर काही समस्या आहे का?
-विर्यपतनानंतर लिंगाची ताठरता जाऊन ते पूर्वस्थितीत येणे ही अतिशय सर्वसामान्य बाब आहे. त्यानंतर पुन्हा लिंगाला ताठरता येण्यासाठी काही कालावधी लागतो. हा कालावधी नेमका किती हे त्या व्यक्तीचे वय, आरोग्य स्थिती, त्यांना जर काही औषधे चालू असतील किंवा काही विशिष्ट आजार असेल तर त्याचा परिणाम यावर अवलंबून असते. तसेच त्या व्यक्तीची विशिष्ट जीवनशैली, ऊर्मी, मन:स्थिती, ताण-तणाव, व्यसने या घटकांवर लिंगाची ताठरता पुन्हा येण्याचा कालावधी अवलंबून असतो. लिंगाची ताठरता टिकवून ठेवणे आणि एकपेक्षा जास्त वेळा लिंगाची ताठरता आणणे यासाठी काही तंत्रे आणि पद्धतीचा अवलंब करता येतो. याचे मार्गदर्शन लैंगिक तज्ञ करतात.
५. रात्री झोपेत वीर्यपतन होणे घातक आहे का?
रात्री झोपेमध्ये वीर्यपतन होणे ही सर्वसामान्य शारीरिक प्रक्रिया आहे. अज्ञानामुळे, लाज वाटणे, अवघडल्या सारखे वाटणे, अपराधी वाटणे, भीती किंवा अन्य नकारात्मक भावनांमुळे विशिष्ट ताण मनावर येतो. त्यामुळेच बरेचदा अशक्तपणा, भावनिक चढ-उतार , झोपेच्या समस्या निर्माण होतात. अशी समस्या असेल तर तज्ञाचे मार्गदर्शन घ्यावे.
६. पुरुषांच्या जननेंद्रियाची सामान्य लांबी काय असावी ? ती कशी वाढवू शकतो?
-पुरुषांच्या जननेंद्रियाची लांबी हा अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे आणि काहींना यामुळे अपुरेपणाची भावनाही सतावते. कधीकधी पॉर्न पाहण्याने पुरुषांमधील गैरसमज वाढतात. अवास्तव अपेक्षा निर्माण होतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंगाची लांबी आणि घेर यामुळे शरीरसुखात काहीही फरक पडत नाही. तरीही गैरसमजातून काहीजण जाहिरातींना फसतात आणि खूप पैसे खर्च करतात. कोणतीही औषधे, तेल किंवा पावडर यामुळे लिंगाची लांबी वाढत नाही. आपल्या जोडीदाराला लैंगिक समाधान देण्याच्या इच्छेने पुरुषांना अनेकदा लिंगाच्या लांबीची चिंता सतावत असते. पण लांबीने काहीही फरक पडत नाही. लैंगिक समाधान दोघांमधले संबंध, मूड, फोरप्ले आदींवर अवलंबून असते.