पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खून प्रकरणात नवीन पुरावे मिळत नसल्याचे सांगत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांचे न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्यात आयआरबीचे प्रमुख वीरेंद्र्र म्हैसकर व त्यांच्या कंपनीतील इतरांना क्लीन चीट दिल्याचा दावा आयआरबीकडून करण्यात आला आहे.गेल्याच महिन्यात जमीन हडप केल्याच्या खटल्यातून आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चे संचालक वीरेंद्र दत्तात्रय म्हैसकर, दत्तात्रय गाडगीळ, आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयआरबी कंपनीला वगण्यात आले होते. पुणे-मुंबई महामार्गालगत लोणावळा येथील जमीन घोटाळ््याचे एक प्रकरण शेट्टी यांनी उघडकीस आणले होते. त्यानंतर शेट्टी यांचा जानेवारी २०१० मध्ये भरदिवसा खून करण्यात आला होता.या गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर आले. त्यामुळे हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. सीबीआयने आयआरबीचे प्रमुख वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह सहा जणांची न्यायालयात नावे दाखल केली होती.म्हैसकर यांच्यासह आयआरबीचे अधिकारी जयंत डांगरे, आयआरबीचे वकील अजित कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक दिलीप शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव कवठाळे यांची नावे सीबीआयने सुरुवातीला निष्पन्न केली.त्यापैकी आंधळकर व सहायक निरीक्षक नामदेव कवठाळे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखलकेले होते. त्यामुळे त्यांचा खटला यापुढील काळात सुरू राहणारआहे.आॅगस्ट २०१४ मध्ये सीबीआयने पहिला क्लोजर रिपोर्ट वडगाव मावळ न्यायालयात सादर केला होता. त्यानंतर शेट्टी यांचा भाऊ संदीप शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितल्याने सीबीआयने पुन्हा चौकशीला सुरुवात केली होती. काही वर्ष तपास केल्यानंतर सीबीआयने पुन्हा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. मात्र, त्याबाबत सीबीआयकडून अधिक माहिती देण्यात आली नाही.आमच्यावर केलेले आरोप खोटेआमच्या विरोधात करण्यात आलेले आरोप हे सीबीआय तपासणीनंतर खरे नसल्याचे दिसून आले आहे. तपासाच्या नऊ वर्षांत सीबीआय पथकाने अनेकवेळा आयआरबीच्या कार्यालयात तपासणी केली. अधिकाºयांची चौकशी, पॉलीग्राफ चाचणी घेतल्यानंतरही कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नाही. त्यामुळे आम्हाला क्लीनचीट देण्यात आली आहे, असे आरबीआयने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटलेआहे.
सतीश शेट्टी खुनाचा तपास बंद, सीबीआयकडून आयआरबीला क्लीन चिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 3:27 AM