खळद : श्री क्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेनिमित्ताने आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात बापू मंडले यास चीत करून सतीश सूर्यवंशी याने श्रीनाथ केसरीची मानाची ढाल व एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे बक्षीस मिळवले. या कुस्त्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुस्तीशौकीन आले होते. नव्याने बांधण्यात आलेल्या शंभर फूट व्यासाच्या आखाड्यात या स्पर्धा पार पडल्या. या वेळी सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेकडो पैलवानांनी या ठिकाणी हजेरी लावली. वीर येथील कुस्ती संयोजन समिती व देवस्थान ट्रस्टने या स्पर्धांचे आयोजन केले होते. मानाच्या पाच कुस्त्यांबरोबर इतरही साठ लहान-मोठ्या कुस्त्या झाल्या. या कुस्त्या पाहण्यासाठी तीन ते चार हजार कुस्तीशौकिनांनी आखाड्याभोवती गर्दी केली होती. या वेळी महाराष्ट्र केसरी सईद चाऊस उपस्थित होते. पंच म्हणून तुषार गोळे, लक्ष्मण जाधव, किरण कांबळे यांनी काम पाहिले. प्रशांत भागवत यांनी केलेल्या निवेदनामुळे आखाड्याला रंगत आली. भागवत यांनी वेळोवेळी सांगितलेला कुस्तीचा इतिहास, माहिती; तसेच खेळत्या समालोचनामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच कुस्ती खेळाचे शिक्षणही होत होते. कुस्त्या चालू असताना कपिल चोरगे याने योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. आखाडा यशस्वीपणे पार पडण्यासाठी कुस्ती आखाडा आयोजन समितीचे बापू धुमाळ, विशाल धुमाळ, अमर धुमाळ, अमोल धुमाळ, संग्राम धुमाळ, रणजितसिंग धुमाळ, देशराज धुमाळ, प्रताप धुमाळ, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ, उपाध्यक्ष संभाजीराजे धुमाळ, सचिव तय्यद मुलाणी, विश्वस्त दिलीप धुमाळ, मंगेश धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ,नामदेव जाधव, बबन धसाडे, अशोक वचकल, सुभाष समगिर यांनी परिश्रम घेतले. ४मानाच्या पाच कुस्त्या चुरशीच्या झाल्या. ७७ हजार ७७७ रुपये बक्षीस व ढाल या द्वितीय क्रमांकासाठी रमेशकुमार व नितीन केचे यांच्या झालेल्या चुरशीच्या लढतीत नितीन केचे याने ढाकेवर दिल्लीच्या रमेशकुमारला चितपट केले. ४तृतीय क्रमांकाच्या ५५ हजार ५५५ रुपये बक्षीस व ढाल यासाठी गणेश हिरगुडे व नवनाथ देशमुख यांच्या लढतीत नवनाथ देशमुख याने गुणांवर हिरगुडे यांच्यावर मात केली. ३३ हजार ३३३ रुपये व ढाल या चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीतही रामा गायकवाड याच्यावर अनिकेत खोपडे याने गुणांवर मात केली.