बारामती : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी पीडित कर्जदाराला चक्क गळ्याला सत्तूर लावल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात घडला आहे. याप़्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत शहर पोलिस ठाण्यात मकमुद्दीन गफुरभाई मुल्ला (वय ६६, रा. खंडोबानगर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार इरफान खुदबुद्दीन पठाण, हैदर खुदबुद्दीन पठाण, शमा खुदबुद्दीन पठाण व सबा इरफान पठाण (सर्व रा. पारिजात अपार्टमेंट, श्रीरामनगर, बारामती) यांच्या विरोधात पोलिसांनी मारहाणीसह महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी मुल्ला हे व्यावसायिक आहेत. त्यांना दुकानासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी इरफान व त्यांचा भाऊ हैदर याच्याकडून ८ जून २०२० रोजी ३ लाख रुपये दरमहा २० टक्क्याने ३ महिन्यांच्या मुदतीसाठी घेतले. ही रक्कम बिनव्याजी घेतली असल्याची नोटरी आरोपींनी करून घेतली. तीन महिन्यांच्या कालावधीत फिर्यादीने ५ लाख ४० हजारांची रक्कम इरफान यांना परत केली.
त्यानंतर देखील इरफान, हैदर, त्यांची आई शमा व सबा इरफान पठाण यांनी वेळोवेळी फिर्यादीच्या घरी येत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दि. २८ रोजी त्यांनी फियार्दीच्या घरी येत ३ लाख रुपये दे नाही तर घरादाराला कापून टाकीन अशी धमकी दिली. फियार्दीसह त्यांची पत्नी, मुलगा व सून यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीकडून मुस्लिम बँकेचे प्रत्येकी ४० व ५० हजार रुपयांचे दोन चेक तसेच सेन्ट्रल बँकेचे प्रत्येकी ३ लाख, १ लाख ७५ हजार रुपये व १ लाख ३० हजार रुपयांचे चेक गळ्याला सत्तूर लावून जबरदस्तीने लिहून घेतल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.